सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

बेपत्ता राधेचा पत्ता...!



देशाच्या फाळणीनंतर निर्वासितांचे लोंढे दिल्लीपासून दूर वसविण्यात आले होते. फाळणीच्या जखमांवर काळाची खपली चढल्यानंतर हळूहळू निर्वासितांनी आपले बस्तान या शहरात बसविण्यास सुरूवात केली. व्यापार-उदीम आणि इतर क्षेत्रांतही या लोकांनी आपला जम बसविला. काळ बदलला आणि त्याबरोबरच फाळणीचे व्रणही पुसट झाले. लाहौर, कराची, पेशावर,रावळपिंडीच्या आठवणींत रमून जाणारे बुजुर्गही काळाच्या पडद्याआड झाले. निर्वासितांच्या वसाहती शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या. या वसाहती आता शहरांतील सधन वसाहतींमध्ये गणल्या जातात. काही शेकड्यांच्या मोबदल्यात मिळालेले भूखंड आज दिल्लीच्या रियल इस्टेट मार्केटमध्ये कोट्यवधींच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. याचे श्रेय अर्थातच मेट्रोला जाते यात शंका नाही. 
मेट्रो या शहराची लाईफलाईन झाली आहे. ज्या भागातून मेट्रोने आपल्या नागमोडी चालीतून अस्तित्त्वाच्या खुणा उमटविल्या आहेत त्या भागाचा कायापालट झाला आहे. जुनाट इमारतींचे रुपडे पालटून त्या जागी अलिशान टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. अरुंद बोळकांडातील बाजारांचे रुपांतर मॉल्समध्ये झाले आहे. पत्र्याच्या डुगडुगणाऱ्या बसची जागा वातानुकुलित बसेसने घेतली आहे. सर्व सुखसोयी असूनही या भागात आजही घरभाडी फारशी नसल्यामुळे बाहेरुन येणाऱ्यांसाठी येथे घर घेणे सोयीचे ठरते. सुरूवातीच्या काळात यामुळेच पटेल नगर परिसरात मी सहकुटुंब राहण्यासाठी आलो होतो.... त्या काळातील हा प्रसंग आजही तेवढाच अस्वस्थ करणारा....... 
रोजच्याप्रमाणे त्या दिवशीही मी घाईघाईने घराकडे निघालो. इमारतीच्या पायऱ्या चढताना जाणवले की, रोज या वेळेला दिसणारी ती काळी बुटकी मुलगी आज नेहमीप्रमाणे दिसत नाही. आमच्या घरमालकाची ही मोलकरीण अर्थात 'डोमेस्टीक मेड'. घरमालकाच्या मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याच्या गडगंज सासुरवाडीकडून हुंड्यासह आलेली ती मुलगी... बारा-तेरा वर्षाचीच असेल... बंगालच्या पुरुलिया जवळच्या कुठल्याशा गावातून रोजगाराला लावण्यासाठी तिच्या आईवडीलांनी तिला दिल्लीला पाठवून दिले होते. दिल्लीत काही दिवस दूरच्या नातेवाईकांकडे राहिल्यावर एका एजन्सीच्या माध्यमातून तिला या घरात काम मिळाले होते. त्याबदल्यात तिच्या आई-वडीलांना वीस हजार रुपये मिळाले आणि महिन्याचे दोन-अडीच हजार रुपयांची फिक्स मनीऑर्डर ....


सुरूवातीच्या काळात ती जिन्यातून आपला चेहरा लपवत खाली राहणाऱ्या मोठ्या मालकाच्या म्हणजेच माझ्या घरमालकाचे घर ते तिसऱ्या मजल्यावर राहणारी नवी मालकीण म्हणजे घरमालकाची सुनबाई अशा फेऱ्या घालत असायची. बिचारी राधा, या फेऱ्या घालून अक्षरशः दमलेली असायची. एकदा मी तिला तिचे नाव विचारले, यावर ती फक्त हसली. आणि बंगालीमिश्रीत हिंदीत विचारले, 
तुमी बंगाली ना ? 
यावर मी नाही अशी मान हलविली. यावर ती पुन्हा हसली आणि 
भैय्या, राधा है नाम असं म्हणाली. तिला पुढे काहीतरी सांगायचं होतं एवढ्यात मोठ्या घरातून तिच्या नावाचा उद्धार झाला आणि ती धावतच खाली पळाली. यानंतर ती हमखास जिन्यात दिसायची. माझी घरी येण्याची वेळ आणि तिची जिन्यातून धावपळ करायची वेळ सारखीच असायची. एरवी, मला बुजणारी राधा त्या दिवसाच्या संभाषणानंतर 'नमस्ते भैय्या' म्हणण्याइतकी धीट झाली होती. राधा सब ठिक एवढं विचारलं तरी तिच्या चेहऱ्यावर अपार समाधान दिसायचं. एक दिवशी बायकोनं तिला थोडी मिठाई दिली. मोठ्या आवडीने तिने ती खाल्ली. त्या दिवशी ती मोडक्या तोडक्या हिंदीत आपल्या परीवाराबद्दल बोलली. चेहऱ्यावर तिचं तेच हसू होतं पण डोळ्यातला विषाद तिला लपविता आला नव्हता.
घरभाडे देण्याचा दिवस असल्यामुळे घरभाड्याची रक्कम घेऊन मी खाली राहणाऱ्या मालकाकडे जाऊ लागलो. पायात स्लीपर्स घालून मी पायऱ्या उतरल्या. खालच्या मजल्यावर येऊन बेल वाजविणार तोच घाईघाईने त्यांचा दुसरा नोकर विठ्ठल बाहेर निघाला.
विठ्ठल, क्या बात है ? मालिक घर मे है तुम्हारे ? मी विचारले.
जी साहब, घर मे है. त्याने उत्तर दिले. कुछ प्रॉब्लेम तो नहीं ना ? मी विचारले.
जी, राधा गायब है, विट्ठलने मला माहिती पुरविली.
क्या ? मी चमकलो. पुलीस मे रिपोर्ट करी ?      
मरना है क्या साब, पुलीस इनको ही ना पकडेगी ? विठ्ठल म्हणाला
मतलब ?
कुछ नहीं , बच्ची छोटी है ना साब. घर की याद आ रही थी. तीन दिनसे घर जाना है बोल रही थी..
बेचारी को छोटी मालकिन ने भुखा रखा था दोन दिन से. तो भाग गयी साब, विठ्ठलने आत आवाज जाणार नाही एवढ्या हळू आवाजात सांगितले.

अरेरे बुरा हुवा, मी म्हणालो. घरमालकाकडे घरभाड्याची रक्कम देऊन मी माघारी आलो.
रात्रीच्या साडेआठ वाजल्या असतील. कुल्फी आणण्यासाठी मी पुन्हा एकदा खाली आलो. घरापासूनच्या जवळच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस कुल्फीचे गाडे उभारलेले असत. रात्रीच्या अंधाराला दूर करणारे महापालिकेचे दिवे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्याने मोठ्या शहरांमध्ये रात्रीचा दिवस होतो. घरापासून थोडे अंतर चालून जातो ना जातो तोच भैय्या, अशी चिरपरिचित हाक माझ्या कानी पडली. मी आवाजाच्या दिशेने पाहिले. दूरवरुन धावतच येणारी एक छोटी मुलगी मला दिसली. जसजशी ती जवळ येऊ लागली तसतशी तिची आकृती स्पष्ट झाली. होय, ती राधाच होती. जसजसं अंतर कमी झालं ती धावतच माझ्याकडे आली
भैय्या, मुझे घर ही नहीं मिल रहा था, अच्छा हुवा आप मिल गए, मुझे घर ले चलो, राधा धापा टाकत बोलू लागली. डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. मुझे घर ले चलो, तीने पुन्हा विनंती केली.
तु थी कहाँ ? मी विचारले
गाँव जाने के लिए निकली थी भैय्या मगर फिर वापस आ गयी, ती म्हणाली
क्यूँ ? मी प्रश्न केला.
बाबा तो वापिसही भेजेगा ना, क्या करुँगी वहाँ जाकर ? तिने प्रतिप्रश्न केला.
तिच्या निरुत्तर करणाऱ्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. 
कुल्फी न घेताच मी माघारी फिरलो. राधाला तिच्या मालकाच्या स्वाधीन करुन मी घरात आलो. पुढची दोन दिवस राधा जिन्यात दिसली नाही. त्यानंतर मात्र ती रोज जिन्यात दिसायची. न चुकता नमस्ते करायची. त्यानंतर चार महिन्यांनी आम्ही ते घर सोडलं. 
एक वर्षाच्या गॅपनंतर त्या भागात जाणं झालं. इमारतीच्या पायथ्याशीच मला विठ्ठल दिसला.
मला पाहताच ओळखीचे हसू घेऊन तो समोर आला.
कैसे हो विठ्ठल मी विचारले
आपकी कृपा है साब. तो म्हणाला
तुम्हारे मालिक ?
ओफीस गए है. सब ठिक-ठाक है
एकदम मला राधाची आठवण आली.
राधा है अभी ? भागी तो नही ? मी विचारले
यावर विठ्ठल हसला. भागी तो नहीं मगर...
मगर क्या ? मी विचारले
घर गयी थी... वापिस आयी ही नहीं. सुना है वही किसी के साथ उसकी शादी करवा दी. विठ्ठल उत्तरला
शादी ? अरे छोटी लडकी है वह
तो क्या होता है साहब, गरीब के मजबूरी की कोई उम्र होती है साहब तो म्हणाला.
मी वर जिन्याकडे पाहिले. उगाचच भांगात लांबवर कुंकू भरलेली राधा मला दिसली. नमस्ते भैय्या ! तिचा आवाज माझ्या कानावर येऊन आदळू लागला.
समाप्त      




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: