रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

दिल्लीची 'छाया'..

दिल्लीच्या कुप्रसिद्ध अशा जी. बी. रोड या रेड लाईट एरियात मी लुबाडला गेलो होतो. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून तिथल्या गुंडांच्या तावडीतून बचावलो देखील. आता त्या परिसरातील गुंडांच्या कित्येक कथा मी वर्तमानपत्रे आणि पत्रकारांकडून ऐकल्या आहेत. या कथा ऐकताना आणि वाचताना शहरांतला माझा पहिला दिवस मला आठवतो.


दिल्ली..... या शहराच्या प्रत्येक गल्लीत एक कहाणी आहे. यातील प्रत्येक कहाणी तुमच्या आसपास फिरणारी असते. ती तुम्हाला बिना अपॉईंटमेंट भेटूनही जाते. जाता-जाता न दिसणारी एक छाप सोडून जाते. असा खोल शिक्का उमटविणारी ही कहाणी तुम्ही पुढे विसरण्याची शक्यता तशी कमीच असते. ती आयुष्यभर लक्षात राहते. दिल अर्थात हृद्य ताब्यात घेणारं हे शहर दिलवालों का शहर म्हणून ओळखलं जातं ते यासाठीच.... या शहरात पाऊल ठेवला त्याच दिवशी अशीच एक कहाणी अचानक माझ्या समोर आली. तिचा न मिटणारा शिक्का अजूनही माझ्या मनावर जसाच्या तसा आहे.
पत्रकार म्हणून माझी या शहरात माझी दुसरी इनिंग सुरू होणार होती. मराठी राष्ट्रपतींची निवड होण्याची चाहूल लागलेला हा काळ...उत्साह, आत्मविश्वास आणि किंचित धाकधूक अशा संमिश्र भावनांची गर्दी घेऊन या शहरात मी दुसऱ्या दिवसापासून फिरणार होतो. नव्या ओळखी, नवे सोर्स, नवे सहकारी इ. इ. जमविणार होतो.


संध्याकाळी साडेसात वाजता नवी दिल्ली स्टेशनवरील प्रवाशांतून वाट काढत दुस-या बाजूने बाहेर पडताच शहराच्या अनोळखी गर्दीत माझे आपसूक स्वागत झाले. छोट्या गावातील शुक्रवारच्या बाजारात गर्दी पाहणारा मी तसा प्रत्येक शहराच्या गर्दीला एव्हाना सरावलो होतोच. मुंबईची बिनचेहऱ्याची, हैद्राबादची तेलुगू अस्मिता जोपासणारी अशी गर्दीची विविध रुपे मला माहित होती. त्यामुळे दिल्लीची गर्दी अऩुभविण्याची माझी पहिली वेळ असली तरी मी घाबरलो अथवा भांबावलो नव्हतो. अर्थात या अनोळखी गर्दीत माझी ओळख निर्माण करण्याचे आव्हान मी स्वीकारले होते.
गर्दीतून वाट काढत टॅक्सी स्टँडवर जाताच माझ्या लॉजवर पोहोचविणारी गाडी माझ्या पुढ्यात आली. ड्रायव्हरने अर्ध्या तासाच्या आत मला मुक्कामी पोहोचते केले. शहरातल हा माझा पहिलाच दिवस असल्याने बाहेर खाण्याशिवाय मला दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे तासभर लॉजवर थांबून हॉटेल शोधण्यासाठी मी बाहेर पडलो.
लॉजच्या बाहेर आलो तेंव्हा रात्रीच्या सव्वानऊ झाल्या होत्या. रस्ता माहित नसल्याने सायकल रिक्षाचा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्याय अर्थातच नव्हता. समोरुन आलेल्या रिक्षाला हात करुन मी त्याला एखाद्या हॉटेलकडे नेण्यास सांगितले.
क्या खाओगे ? त्याने विचारले.
कुछ भी, अभी तो भुख लगी है जो मिलेगा वह चलेगा. मी म्हटले.
थोड्याच वेळात एका मळकट हॉटेलसमोर त्याने रिक्षा थांबविला.
कितना ? मी विचारले.
चालीस रुपया साहब, त्याने भाडे सांगितले.
आढेवेढे घेण्याचा प्रश्नच नव्हता. याचे कारण म्हणजे एकतर दर माहित नव्हते आणि दुसरे म्हणजे भाडे ठरविले नव्हते. त्याने सांगितलेले भाडे देऊन मी त्या कळकट हॉटेलात शिरलो. मिळेल ते खाऊन तासाभराने तेथून बाहेर पडलो. पण तोपर्यंत रस्त्यावरची गर्दी विरळ झाली होती. सायकल रिक्षा कुठेच दिसत नव्हता. लॉजचे नाव माहित असल्याने आणि येताना थोडाफार रस्ता लक्षात ठेवल्याने अखेर चालतच हॉटेल गाठण्याचे ठरविले. या शहराची आणखी एक खासियत म्हणजे तुम्ही नवीन असाल तर ते इकडच्या लोकांच्या चटकन लक्षात येते आणि त्यानंतर तुम्हाला किमान एक मैल जास्तीची रपेट घडविण्यात त्यांना आनंद वाटतो. माझ्या बाबतीतही तसेच झाले.
रस्ता माहित नसल्यामुळे समोरुन येणाऱ्या बऱ्यापैकी दिसणा-या एका तरुणाला मी रस्ता विचारला. खांद्यावरची ऑफीस बॅग सावरत त्याने माझ्याकडे पाहिले आणि विचारले,
नए हो क्या ?
आजही आया हूँ. रस्ता बताओगे तो मेहरबानी होगी. मी त्याला विनंती केली.
तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, भाई, चोर-उचक्के होते है इस रास्ते पर. जरा संभलके चलो. त्यानंतर त्याने रस्ता सांगायला सुरूवात केली. त्याने मार्गदर्शन केल्याप्रमाणे चालतच मी लॉज शोधत निघालो. साधारणतः वीस मिनिटांच्या पायतोडीनंतरही लॉज मिळाला नाही आणि आपण रस्ता चुकलो हे तत्काळ लक्षात आले. पण तोपर्यंत बराच वेळ झाला होता. अखेर पुन्हा तेच ठिकाण गाठण्याचा निर्णय़ घेतला. आलेल्या रस्त्याने परत जात असताना निम्म्या रस्त्यात तोच तरुण पुन्हा दिसला. माझ्याकडे लक्ष जाताच त्याने विचारले.
भाई, क्या हुवा, रस्ता नहीं मिला ?
नया हूँ ना, इसलिए भूल गया. मी त्याला उत्तर दिले.
कोई नहीँ जी, मै पहूँचा देता हूँ. वहींसे जाना है मुझे त्याने सुचविले.
दुसरा पर्याय दिसत नसल्याने मी पण त्याच्या या प्रस्तावाला होकार दिला.
दिल्ली के नहीं लगते, साऊथ इंडियन हो क्या ? त्याने विचारले.
हाँ, हैद्राबाद से हूँ. मी त्याला सांगितले.
हैद्राबादी बिर्याणी अच्छी लगती है. तो म्हणाला.
हं... रस्ता हरविल्यामुळे थोडी धाकधूक होऊ लागली होती. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे माझे फारसे लक्ष नव्हतेच.
भाई, इस गली से आगे निकलते है. मेरा घर है वहाँ पे. बैग रखता हूँ और फिर आगे चलेंगे. तो म्हणाला.
जी, क्यूँ नहीं. जरुर. मी उत्तर दिले.
पन्नासेक मीटर अंतर चालून गेल्यावर एका गल्लीत तो वळला. आत जावे की नाही याचा विचार करत मी तेथेच थांबलो. मला थांबलेले पाहून तो म्हणाला, आईए, कोई नहीं. बैग रखकर आगे निकल जाएंगे. यात गैर काहीच नव्हते. त्यामुळे मी पण त्याच्या मागे-मागे निघालो. पुढे जाऊ तशी ती गल्ली अधिकच अरुंद होऊ लागली. खिडक्यांतून काही डोळे माझ्याकडे पाहत असल्याचा उगाचच भास होऊ लागला. गल्ली क्रॉस केल्यावर थोड्याच वेळात आपण लॉजवर पोहोचू असा स्वतःलाच दिलासा देत मी त्या तरुणाच्या मागे मागे जात होतो. एवढ्यात तो एका घरासमोर थांबला. समोरच्या अरुंद जिन्यातून तो वर चढू लागला. मी गोंधळून तेथेच उभा राहिलो. मला थांबलेले पाहताच तो जिन्यातूनच ओरडला
भाई, अंदर आ जाओ एरिया खराब है.
त्याचा आवाज ऐकून मी त्याच्या मागे मागे जिना चढू लागलो. जिना पुर्ण चढून जाताच समोरचे दृश्य पाहून माझ्या छातीत धस्स झाले. आतापर्यंत सज्जन वाटणारा आणि मला रस्ता दाखविणारा तरुण माझ्या समोर चाकू घेऊन उभा होता. मी आल्या पावली परत जाण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मागूनही एकजण चाकू घेऊन थांबलेला होता. दिल्लीतील ठकसेनांच्या टोळीने शिकार बनविल्याचे एव्हाना लक्षात आले होते.

गलत किया तुमने, मी जवळपास ओरडलो.
त्यावर त्याने एक जोरदार शिवी हासडली आणि दम देत म्हणाला, जितना माल है उतना बाहर निकालो. नहीं तो बॉडी का सारा माल बाहर निकाल देंगे.
एवढ्यात माझ्या मागून आलेल्या दुस-या तरुणाने मला मागून आपल्या विळख्यात पकडले. त्या तरुणाने माझे खिसे तपासून पैशाचे पाकीट काढून घेतले.
देखो, तुम्हे जो चाहिए था वह मिल गया है. अब मुझे जाने दो.
माझ्या समोर जगातले सगळे देव उभे राहिले होते. त्यातल्या प्रत्येकाची करुणा भाकत मी त्याला जाऊ देण्याची विनंती केली.
जाने देंगे. मगर एटीएम से पैसा निकालने के बाद.. त्याने हातातल्या पाकीटातून कार्ड बाहेर काढून त्याच्या पंटरकडे सोपविले.
नंबर बोल इसका नहीं तो यहीं घुसेड दूँगा साले. त्याने मला धमकाविले. नंबर सागण्याशिवाय दुसरा मार्गही नव्हता. मी त्याला पासवर्ड सांगितला. कार्ड घेउन तो पंटर बाहेर पडला.
बैठ जाव समोरच्या स्टुलावर बसण्याचा त्याने इशारा केला. मी मुकाट्याने आता पुढे काय वाढून ठेवलंय याची वाट पाहू लागलो. एवढ्यात एक निम्म्या वयाची बाई त्या तरुणाकडे आली.
इसको यहाँ क्यूँ लाया रे ? माझ्याकडे पाहत तिने त्या तरुणाला खडसावले.
नया है. घर मिलेगा नहीं वापस इसे. त्याने त्या बाईला समजावले.
क्या मिला इसके पास ? तिने विचारले
पर्समें दो हजार रुपये है. और एटीएम कार्ड से पैसे लाने भेजा है छोकरे को त्याने माहिती दिली.
दिखा पर्स इधर त्या बाईने माझे पाकीट जवळपास त्याच्याकडून हिसकावून घेतले आणि ती आत निघून गेली. एवढ्यात कार्ड घेऊन आलेला पोरगा आत आला. कितना मिला रे ? त्या तरुणाने विचारले. सात हजार रुपया त्या पोराने सांगितले. चिरकूट साला... कितना कम रखता है बे तु बैंक मे माझ्याकडे पाहत त्याने विचारले. तुमको जो चाहिए वह सब मिल गया. अब तो मुझे जाने दो. मी त्याला पुन्हा विनंती केली. सोनू इसको पहाडगंज वाली लॉज तक पहूँचा दे. त्याने पोराला हुकूम दिला. माझा जीव भांड्यात पडला. घाईघाईने मी पायऱ्या उतरु लागलो. जवळपास निम्मा जिना उतरलो असेल एवढ्यात पाठीमागून आवाज आला. सोनू, रुक उसको इधर लेके आव. हा आवाज मघाशी पाकीट घेऊन गेलेल्या बाईचा होता. अंगाला दरदरून घाम फुटला होता. जीव काकुळतीला आला पण त्या पोराने जवळपास मला खेचतच पुन्हा एकदा त्या बाईसमोर नेऊन उभा केले.

किधर से आया रे तू त्या बाईने मला प्रश्न केला
हैद्राबादसे आया हूँ मी उत्तर दिले.
हैद्राबादी दिखता है. मगर लगता नहीं. ती बाई म्हणाली
ठिक से बोल. कहाँ से आया है तु
महाराष्ट्र से हूँ मगर हैद्राबाद में नोकरी करता था
अच्छा कोणत्या गावचा हायेस त्या बाईच्या तोंडून मराठी शब्द ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला
सोलापूर जिल्ह्यातला आहे, बाई मला जाऊ द्या. मी इकडे फिरकणार पण नाही. मी काकुळतीला येऊन त्या बाईला विनंती केली.
करमाळ्याचा हाईस का तु ? तिने पुन्हा विचारले. माझ्या गावचं नाव तिच्या तोंडून ऐकून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.
होय. मी उत्तरलो. आश्चर्याचा हा धक्का ओसरतो ना ओसरतो तोच तिने पुन्हा एक मोठा बॉम्ब टाकला.
वांगीला अवघडे गुरजी हायेत ते कोण रं तुझं ? आता मात्र मी पक्का गारद झालो होतो.
माझे सख्खे चुलते. पण तुम्ही कसं काय ओळखता ? मी आवंढा गिळत विचारले
मला शिकीवलंय त्यांनी. ती बाई उत्तरली
मी पुन्हा हैराण.
ये हरामखोरा, पैसे इधर ला सारे. किस को लूट रहा था साले. तिने शिव्यांची लाखोली वाहत त्या तरुणाच्या हातातले सारे पैसे आणि एटीएम कार्ड तिच्याकडे घेतले. ते सगळे पैसे पाकीटात ठेऊन तिने पाकीट माझ्या हातात दिले. एखाद्या चित्रपटात शोभावा असा तो प्रसंग माझ्यासोबत घडत होता. अजूनही माझा माझ्या नशीबावर विश्वास बसत नव्हता. चाकूच्या टोकावर काही क्षणापुर्वीच मला लुटणारा तो तरुण आणि त्याचा पंटर हे दोघेही आता माझ्याकडे आपुलकीच्या नजरेने पाहू लागले.
वांगीचीच हाय मी. गुरजींनी लिवायला शिकिवलं. लई चांगलं होतं गुरजी. लई माया करायचे. कधीकधी खायला बी द्यायचे. पण चौथीची परीक्षा दिल्या दिल्या पुण्याला जावं लागलं आई-बापाकडं.... लगीन झाल्यावर नवऱ्यासोबत आले बघ हिकडं... पण त्या मुडद्याने मला इकून धंद्याला लावलं. ही पोटची पोरं नाहीत पण हिथं स्टेशनावर सापडलेली पोरं हायीत. संभाळत्यात मला असं काय बी धंदं करुन. मगाशी पाकीट बगताना तुझं गाव आणि नाव वाचलं. तवाच माज्या लक्षात आल्तं की तु गुरजीचा कोण तरी असशील. त्या बाईनं सगळं एका दमात सांगितलं. मी तिचं बोलणं ऐकतच राहिलो. दिल्लीनं आल्या आल्या दिलेला हा सर्वात मोठा दणका होता. मला काय करावं तेच कळत नव्हतं.
काय खाल्लंय का रं बाबा तु. चाय पेणार का ? तिनं विचारलं.
नको मी कसंबसं म्हणालो खरं पण पोटात कसंतरीच होत होतं.
अरं धंदेवाली असली तरी लई साफ-सफाई ठेवते मी. ती बोलली आणि सोनू कडे बघत दोन चाय ला रं अशी ऑर्डर सोडली. सोनू लगेच बाहेर पडला. रात्रीच्या जवळपास साडे-अकरा वाजल्या होत्या.
पहिलाच दिवस आहे माझा आजचा इथला. मी म्हणालो
संभाळून चाल रं बाबा. ही दुनिया लई बेका हाय तीनं काळजीच्या सुरात मला समजावलं
वांगीला लई मासं असत्यात. तिथली शाळा अजून बी तशीच हाय का तिनं विचारलं
मला नाही सांगता येणार पण गेल्या वर्षी तिथं बांधकाम सुरू होतं. मी तिला माहिती दिली.
आणि गुरजी . रिटायर झालं असत्याल आता.
होय, सहा वर्षापुर्वीच रिटायर झाले. मी तिला माहिती दिली.
त्यांची पोरगी ?
वारली. मी सांगितले
कशानं. ?
स्वयंपाक करताना भडका झाला स्टोव्हचा,
अरारा... आमी खेळायचो ल्हानपणी
तु हिकडं कशासाठी आलास
नोकरीसाठी आलोय. लॉजवर उतरलोय. जेवायला बाहेर पडलो होतो. तेवढ्यात.... मी म्हणालो
कशात कामाला लागलाय. तिने मला निम्म्यात तोडून विचारले.
मी टिव्हीत काम करतो. मी माहिती पुरवली
टिव्हीत ? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.
एवढ्यात सोनू प्लास्टीकच्या कपात चहा घेऊन आला.
घे चाय पे. माझ्याकडे एक कप सरकावित दुसऱ्या कप तिने स्वतःच्या हातात घेतला.
पोट भरलेले होते पण आता नको म्हणायचीही सोय नव्हती. मी बळेबळे चहा पिऊ लागलो.
रातच्याला असा फिरत जाऊ नको. लई बेकार एरीया हाय ह्यो. हिथला लॉज उद्याच्या उद्या सोड. माझी पोरं तुला चांगल्या एरियात लॉज करुन देतील. हिथली माह्यती होईपर्यंत तिथंच ऱ्हात जा. चहाचा रिकामा कप खाली ठेवत तिनं सोनू ला हाक मारली. सोनू लगेच तिथं दाखल झाला.
ह्ये बघ, मेरे गाव का बडा आदमी है ये. इसकू लॉजतक पहूँचा दे. और कल के कल अच्छा लॉज करके दे इसको. तिने सोनूला हुकूम सोडला.
नाही नाही. याची गरज नाही. माझ्या ऑफीसची माणसं करतील सोय मी तिला थांबवलं.
बरं... गुरजीला सांग, छायानं नमस्कार सांगितलाय म्हणून.आतापर्यंत करारी वाटणाऱ्या बाईच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाल्यासारखं वाटलं. दोन मिनिटे शांततेत गेली.
थोडा थांब. तिनं मला थांबविलं.
ती आत गेली. येताना तिच्या हातात छोटी पिशवी होती. तिने त्या पिशवीत हात घालून शंभराच्या नोटा बाहेर काढल्या. वांगीला गेलास तर माझ्या नावानं मलिकसायबाला एवढं पैसे देशील का ? तिनं मला विचारलं.
देईन की. न द्यायला काय झालं. ? मी शंभराच्या दोन नोटा तिच्याकडून घेत माझ्या खिशात ठेवल्या आणि निघालो. जिना उतरुन झाली येऊ लागलो. माझ्या पुढे सोनू आणि पाठीमागे छाया असा आमचा लवाजमा जिन्याच्या खाली उतरला.
पुना, येऊ नगंस हिकडं. तिनं मला सांगितलं.
दुसरा कुणी असता तर आतापर्यंत कुत्र्यासारखा मारला असता या पोरांनी. तिनं सांगितलं.
सोनू, अपने इलाके के लडकों बोल इस को कभी भी हात नहीं लगाने का. तिने फर्मावले
सोनूने काहीही न बोलता होकारार्थी मान हालविली.
तुमची पोरं?
हीच हायीत माझी पोरं. एक व्हतं पण नवरा घेऊन गेला पुण्याकडं. आता ते मला वळकत बी नसंल. सतरा वर्ष झाली. तवापासून रेल्वे स्टेशनावरची ही पोरं मी सांभाळली. स्वता धंदा करुन पैसा कमावला आणि ही आठ पोरं संभाळली. आता मी सगळं बंद केली ही पोरं मला संभाळत्यात. काय बी करत्यात पण कुण्या बाईला छेडत नाहीत ना कुण्या पोरीला कधी हात लावत. ती अभिमानानं सांगत होती.
पुण्याला किंवा वांगीला चला तिथं राहून काम करुन खा इथं राहण्यापेक्षा मी सुचवलं
नगं, कोणत्या तोंडानं जाऊ. सगळ्यांना माहीत हाय मी काय करत व्हते. त्यापेक्षा आपलं हीथंच बरं हाय
बरं तु जा आता. लई येळ झाला आता. पोरांच्या धंद्याचा टाईम हाय. असं म्हणत ती माघारी वळाली आणि जिना चढून समोरच्या घरात शिरली. पुन्हा मागे दोन-तीन वेळा वळून पाह्यलं. सोनूच्या पाठोपाठ चालत दहा मिनिटांच्या आत मी माझ्या रुमवर पोहोचलो.
दिल्लीचा हा पहिलाच अनुभव. गल्लीतून मघाशी माझ्यावर रोखलेल्या नजरा कोणाच्या हे आता माझ्या लक्षात आलं होतं. एखाद्या सिनेमाची बाराच्या बारा रिळे माझ्या समोरुन फिरून गेली होती. छायाची कहाणी राहून राहून माझ्यासमोर येत होती. आता कोणत्या तोंडानं परत जाऊ ? हा तिचा सवाल कानावर राहून राहून आदळत होता. छायाला भेटलो त्या दोन तासांत भय, आश्चर्य, करुणा असे असंख्य भाव माझ्या समोर फेर धरुन नाचत होते. आता मात्र मी या शहरात आणखी पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार करत छतावर फिरणा-या पंख्याकडे पाहत झोपेची वाट पाहू लागलो पण झोप केंव्हाच उडून गेली होती.