सोमवार, २१ मार्च, २०११

नन्ही चिडियाँ...

त्याचं नाव लखन शास्त्री. एक दिवस रात्री उशीरा द्वारका सेक्टर 12 च्या मेट्रो स्टेशनहून घरी परतत असताना मला भेटला. थंडीचे दिवस होते त्यामुळे स्टेशनच्या बाहेर तीन-चार रिक्षावाले उभे होते. लखन त्यापैकीच एक. घरापर्यंत जाण्याचे पंधरा रुपये देतो म्हटल्यावर तो तयार झाला. पारा प्रचंड गोठलेला असतानाही डोक्याला केवळ एक मफलर, अंगात फाटशी पँट, स्वेटर आणि टिशर्ट यांचा मध्यबिंदू असणारा शर्ट त्याने घातला होता.
मी विचारले, थंड नही लगती.
त्यावर सायकल चालविता चालविताच तो मागे वळाला आणि म्हणाला
साब, पेट भरना हो तो भूख लगती ही नहीं. हम तो गालीब नहीं जिसे हुक्के का मलाल हो.
त्याचे हे वाक्य ऐकून मी कान टवकारले आणि त्याला म्हटले अरे भाईसाब, आपकी भाषा तो बडी साफ है. आप गालीब को कैसे जानते हो.
हे विचारताच तो हसला आणि म्हणाला, कुछ पढा है इसिलिए.
एका रिक्षावाल्याला वाचनाचा छंद असल्याचे पाहून माझे कुतूहल चाळवले. मी विचारले, क्या पढा है भाई आजतक ? त्यावर मात्र तो थबकला आणि थोड्या वेळाने म्हणाला, ' साब, जाने दिजीए यह तो गुजरा जमाना हो गया."
माझे घर जवळ येऊ लागले होते. मी पुन्हा विचारले, 'पढे-लिखे मालूम होते हो. कुछ लिखते भी हो क्या ?" त्यावर त्याने सायकलची गती मंद केली आणि माझ्याकडे वळून म्हणाला, "जी लिखता हूँ. बच्चों की कविताएँ लिखता हूँ. अबतक तीन सौ कविताएँ लिखी है."

मी म्हटले, 'अच्छा !' माझ्या आवाजात आश्चर्य आणि अविश्वास यांचा मिलाफ होता ज्यात अविश्वासाचा टक्का अधिक होता. मी विचारले, ' अभी है तुम्हारे पास ?'.
त्यावर सायकल चालवत चालवतच त्याने त्याची समोरच्या कॅरेजला अडकविलेली वही माझ्याकडे दिली. त्या मळकट झालेल्या वहीचे एक-एक पान उघडून मी कविता वाचू लागलो. कुठे नदीच्या पात्राची खळखळ, कुठे अल्लड सूर्यकिरणांचा चाळा, कुठे नन्ही चिडिया घरी बोलाविण्यासाठीची लाडीक विनवणी, बाळाला घास भरविण्यासाठी झाडाला लटके लटके रागावणारी आई, शांत झोपेत स्वप्नाच्या दुनियेचा राजकुमार झालेला बाळ.... एक ना दोन तब्बल तीनशे.....
पण मी वाचल्या फक्त दहा-पंधरा कविता कारण तेवढ्यात माझे घर आले. त्याचे पैसे चुकते करण्यापुर्वी विचारले, ' इतनी अच्छी कविताएँ कही छपवायी नहीं.'
त्यावर तो म्हणाला साब,' कहाँ छपवाऊँ. अखबारों मे कुछ एक प्रकाशित हो चुकी है बस्स.'
विषय बदलून मी विचारले, 'शादीशुदा हो क्या ? कुछ बच्चे है तुम्हारे ?'
त्यावर त्याच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी तरळले म्हणाला, 'साब आपने इसमें नन्ही चिडियाँ कविता पढी है न्... मेरी नन्ही चिडियाँ कब की उड गयी साब.... उत्तर प्रदेश के बुंदेलखंड से हूँ..... अकाल से पेट और जेब खाली हो गयी. जब गुडीयाँ बिमार पडी तो एक हजार रूपये एकड से पाच एकड जमीन बेच डाली. सारा पैसा इलाज में खर्च किया. मगर फिर भी मेरी गुडीयाँ नहीँ बची. मेरे हाथों मे दम तोड दिया.... उसे नन्ही चिडीयाँ यह कविता बहुत अच्छी लगती थी. अब किसे सुनाऊँ यह कविता......?"
त्याच्या आणि माझ्या डोळ्यांतही अश्रूंची गर्दी झाली. मी त्याचे पैसे चुकते केले आणि गेटवरून आतपर्यंत येउ लागलो तोच डोक्यात विचार आला की, त्याच्या कविता तर आपण छापू शकलो तर.....
मी गेटपर्यंत परत आलो पण तोपर्यंत तो धुक्यात हरवून गेला होता. घराच्या आत येताच समोर माझं पिल्लू उभं होतं. बापाने त्याच्यासाठी काय आणलंय या जिज्ञासेपोटी त्याने मी घरात पाय टाकायच्या आतच माझी पिशवी जवळपास हिसकावून घेतलीही होती. बाजूला माझ्या पिल्लाची कलकल सुरु असतानाच लखन शास्त्रीची नन्ही चिडियाँ माझ्या मनात चिवचिवत होती........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: