शनिवार, ८ डिसेंबर, २०१२

बातमीचे ओझे



( काही अपरिहार्य कारणांमुळे यातील काही पात्रे आणि प्रसंग यात थोडाफार बदल केला आहे. )
टिव्हीच्या धंद्यात डेस्कवाल्यांना फिल्डवर जाऊन बातम्या कव्हर कराव्याच लागतात असे मुळीच नाही. आजकाल तो ट्रेंड रुजला असला तरी हैद्राबादला ई टिव्ही मराठीच्या सुवर्णकाळात फिल्डवर जाऊन बातम्या कव्हर करण्याची संधी मिळणे म्हणजे डेस्कवाल्यांसाठी पर्वणीच असायची. अर्थात कोण कोण कुणाचा पठ्ठ्या आहे अगर कुणाच्या डोक्यावर कोणाचा हात आहे यावरुन कुणी बाहेर जायचे आणि कुणी आत बसायचे हे ठरायचे. असो. हि सर्व प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे डेस्कवाल्यांना कधीकधी डोळसपणे बाहेर पडणे कसे आवश्यक आहे हे सांगणारा किस्सा मला तुमच्यापुढे मांडायचा आहे. धंदा बातमीचा, तसा जोखमीचा त्यामुळे जरासी सावधानी महत्त्वाची असतेच...नाहीतर अनेकदा मानेवर अनामिक ओझे उभा राहते जे तुम्ही कधीच उतरवू शकत नाही.
ई व्ही मराठीच्या हैद्राबाद कार्यालयात राज्यातील सर्व टूएमबी सेंटर्स जोडली गेल्यानंतरच्या काळात खऱ्या अर्थाने न्यूजरुमचे वारे संचारले. एरव्ही कोसलाईट हाऊस अंधेरी येथील कार्यालयातून संचलित होणारा ममा ( महाराष्ट्र माझा ) हैद्राबादला आल्यावर प्रचंड गतीमान झाला. त्यामुळे अर्थातच सर्वात विश्वासार्ह बातमीपत्र म्हणून महाराष्ट्र माझाचा गवगवा झाला. याचे श्रेय मेघराज पाटील यांना जेवढे देता येईल तेवढेच या बातमीपत्रावर जीवापाड प्रेम करणारे बुलेटीन प्रोड्यूसर्स, पॅनेर प्रोड्युसर्स आणि अँकर्स यांना द्यावे लागेल. संध्याकाळचा महाराष्ट्र माझा प्रचंड लोकप्रिय ठरल्यावर सकाळचा महाराष्ट्र माझा काढण्याची कल्पना डेस्कवर रुजली आणि ती पाहता-पाहता अंमलात आणलीही गेली. सकाळचे पहिले बातमीपत्र काढण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे पुढचे काही दिवस माझी नाईट शिफ्ट लागणार हे निश्चित होते आणि झालेही तसेच.
बातमीपत्र सुरू होईन एक-दीड आठवडा झाला असेल. एक सुत्र ठरले होते. ते म्हणजे संध्याकाळच्या बातमीपत्रातून रिजेक्ट झालेल्या स्टोरीज सकाळी कॅरी केल्या जातील. त्यानुसार रात्री साडे-अकरा वाजता डेस्कवर पोहोचताच एक भेंडोळे हाती येत असे त्या भेंडोळ्यात संध्याकाळच्या ममाच्या प्रोड्युसरने दिलेल्या सूचना आणि नाकारलेल्या बातम्यांच्या स्क्रिप्ट यांचा समावेश असायचा. त्यादिवशी मी डेस्कवर आलो. नेहमीप्रमाणे ते भेंडोळे हाती घेतले आणि एक-एक बातमी पाहत स्क्रीप्ट बाजूला ठेऊ लागलो. लातूरहून आलेल्या एका बातमीच्या हेडींगने माझे लक्ष वेधून घेतले. आमचा लातूरचा स्ट्रींजर आनंद गायकवाड ने पाठविलेली ती स्टोरी होती. एका दलित मुलावर गावातील सवर्ण मुलांनी बलात्कार केला अशी ती स्टोरी... 

आनंदने लिहिलेल्या स्टोरीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंद झाला होता. हि बातमी रिजेक्ट झाल्याचे मला आश्चर्य वाटले. मी पुन्हा एकदा ती नजरेखालून घातली.
आनंदने लिहिले होते की, गावातील चार सवर्ण मुलांनी त्या मुलाला मारहाण केली आणि त्यानंतर कंडोमचा वापर करुन त्याच्याशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेनंतर भेदरलेल्या त्या मुलाने आपल्या पालकांसह पोलीस स्टेशन गाठले आणि त्या सवर्ण मुलांच्या विरोधात केस दाखल केली. पोलीसांनी केस दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. पण पत्रकारांच्या रेट्यानंतर नंतर केस दाखल करुन घेण्यात आली. आणि मुलाचे वैद्यकीय केले असता त्याच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. घटना घडल्यानंतरच तीन-चार दिवसांनी त्याने ही बातमी केली होती. त्या स्टोरीमध्ये कंडोम, संभोग , वीर्य असे सहजासहजी वापरता न येणारे शब्द आनंदने वापरले होते. संध्याकाळच्या बातमीपत्रास एक मॅडम असल्याने हे शब्द वाचून त्यांनी ती स्टोरी न वापरता सकाळच्या बातमीपत्रासाठी फॉरवर्ड केली होती.
ही स्टोरी संध्याकाळच्या बातमीपत्रातून रिजेक्ट होऊ शकते ही बाब मुळात मनाला पटणारी नव्हती. मीच काय पण मराठवाड्यातील दलित अत्याचाराच्या घटनांची ज्याला माहिती आहे तो कोणताच व्यक्ती ही बातमी रिजेक्ट करण्यास धजावणे शक्यच नव्हते. कदाचित नजरचुकीने राहीली असावी म्हणून त्या बातमीवर ही बातमी संध्याकाळच्या बातमीपत्रातच वापरावी असा शेरा लिहून पुन्हा संध्याकाळच्या बातमपत्रासाठी पाठविली. त्या दिवशीचे सकाळचे बातमीपत्र प्रसारीत झाल्यावर आणि माझी शिफ्ट संपल्यावर मी निघून गेलो. जाताना मला ती बातमी संध्याकाळच्या बातमीपत्रात दिसेल अशी आशा होती. नाईट-शिफ्ट केल्यानंतर दिवसाची झोप झाल्यावर संध्याकाळी सातचे बातमीपत्र पाहणे हा शिरस्ता होता. त्यादिवशी काही कारणांमुळे मला संध्याकाळचे बातमीपत्र पाहता आले नाही. पण ती बातमी डोक्यात होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी साडेअकरा वाजता डेस्कवर हजर होताच ते भेंडोळे मी हाती घेतले.

 भेंडोळे उघडण्यापुर्वीच एक निरोप मिळाला, बॉसला फोन करा.    
मी फोन केला. माझा फोन जाताच पलिकडून बॉसने विचारले.
गिरीश, तुम्ही ती लातूरची रेपकेसची बातमी फॉरवर्ड का केलीत ? इति बॉस
सर, ती दलित अत्याचारासंदर्भातील बातमी होती. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील म्हणून
पण तुम्ही ती स्क्रीप्ट वाचलीत.- 
होय
एक महिला संध्याकाळच्या बातमीपत्राला आहे तरीही तुम्ही ती फॉरवर्ड केलीत ?
माफ करा पण ती स्क्रीप्ट सुधारून घेता आली असती
मग तुम्ही का सुधारुन वापरली नाही
कारण ती संध्याकाळीच वापरल्यास ती अधिक परिणामकारक होईल असे मला वाटले.
फालतू कारणे सांगू नका. आज सकाळी तुम्ही ती कुठेतरी वापरुन टाका छोटीशी फोनवरुनही बॉस चिडलेला आहे ते जाणवत होते.
छोटी ? का सर..
हे पहा गिरीश, याचे खुप मोठे महाभारत झालेय. स्टोरी छोटीच वापरा...  बॉसचा फायनल आदेश झाला.
ओके.  मी फोन ठेवला.
फोनवर बोलून झाल्यावर मी भेंडोळे सोडून ती स्क्रीप्ट वाचायला घेतली. त्यावर अनेक निळ्या, लाल आणि हिरव्या शाईंच्या पेनांनी संपादकीय संस्कार केले होते. अखेर त्या संस्कारातून एक नवीच स्क्रीप्ट तयार झाली होती. आणि तिचा साईजही लक्षणीयरित्या घटला होता. एका मुलावर बलात्कार झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आणि पोलीस तपास करीत आहेत अशा आशयाची ती बातमी तयार झाली होती. त्यातला तो मुलगा दलित असल्याचा आणि त्यावर सवर्णांनी अत्याचार केल्याचा आशय पुर्णपणे हद्दपार झाला होता. मी पुन्हा बॉसला फोन लावला 

बॉस, मी बोलतोय
बोला, त्या बातमीबद्दलच का
होय. तीचा आशयच पुर्णपणे बदलून गेलाय.
मीच केलेय ते
पण
हे बघा, आपल्याला दंगली पेटवायच्या नाहीत
पण त्या मुलाला किमान न्याय तरी देऊ शकतो की नाही आपण
मला एक सांगा, बॉस कोण आहे तुम्ही की मी ? बॉसने अखेर ठेवणीतील अस्त्र काढले.
ठिक आहे. जशी तुमची इच्छा... मी फोन खाली ठेऊन दिला.
दुपारच्या शिफ्टची माणसे निघून गेल्यावर मी आनंदला फोन लावला
आनंद...
बोला साहेब, पलिकडून आनंदचा पेंगुळलेल्या स्वरात प्रतिसाद आला
अरे त्या रेपकेससंदर्भात पुढे काय झाले का
काय साहेब, तुम्ही लावली नाहीत ती बातमी आनंद ने तक्रार केली.
आज घेतोय. सकाळच्या बातमीपत्रात. तुम्ही जरा पुढे काय घडलं त्याची माहिती घ्या.
ओके सर, आनंदने फोन ठेवला.
एका नव्या कॉपी एडीटरकडे स्क्रीप्ट देऊन मी बुलेटीन अरेंज करण्याच्या कामात गढून गेलो.
रनऑर्डर तयार झाल्यावर सकाळी सहा वाजता मी पुन्हा एकदा आनंदला फोन लावला.
आनंद, सकाळचे सहा वाजत आहेत. काही माहिती मिलाली का
माफी असावी साहेब. मी माहिती घेतो. आनंदने उत्तर दिले.
ठिक आहे. मोंताज पडल्यावरच आनंद माहिती देतो का असे म्हणत मी फोन ठेवला.
खरेतर त्या मुलाचे पुढे काय झाले याची मला उत्सुकता लागून राहिली होती.  
पंधरा मिनिटांतच आनंदचा फोन आला.
साहेब, अपडेट आहे.
काय झाले मी उत्सुकतेने विचारले
त्या मुलाने आत्महत्या केली. आनंदने एका दमात सांगितले.
काय ? मी जवळपास ओरडलोच.
यापेक्षा वाईट म्हणजे, त्याच्या पालकांनी केस मागे घेतलीय आणि ते गाव सोडून पुण्याला निघून गेलेत परत न येण्यासाठी....
मग आता काय करायचं मी विचारलं.
तुम्हीच ठरवा असं म्हणून त्याने तो फोन ठेऊन दिला. 
 मी काय ठरविणार ? तेवढ्यात मोंताज पडला आणि बातमीपत्र सुरू झाले. सुदैवाने की दुर्दैवाने त्या दिवसी जाहिराती जास्त असल्याने ती बातमी एअर झालीच नाही. मी पुन्हा त्या स्क्रीप्टवर झालेली अपडेट लिहीली. पुढे जोपर्यंत मी नाईट-शिफ्टला होतो तोपर्यंत मी त्या बातमीची पुढची बातमी येईल याची वाट पाहिली. पण ती बातमी आलीच नाही. आजही डेस्कच्या लाल फितीत अडकलेल्या त्या बातमीची आठवण झाली की मन बेचैन होते. एका कुटुंबाला न्याय न देऊ शकल्याची बोच लागते. त्याहीपेक्षा एका लायक बातमीची हेळसांड झाल्याचे ओझे मनावर आहे त्याचा भार असह्य होतो हे सर्वात वेदनादायी..... माझ्यासाठी आणि आनंदसाठीही.... बॉस आणि त्या मॅडमच्या मनाचे काय ते माहित नाही...!