रविवार, १० जून, २०१२

हिशोब


एअर इंडियाच्या कार्गो सेक्शनमधील त्या तुटक्या काऊंटरवर बसलेला सरदार अधूमधून मिशीला पीळ देत कुणाची तरी वाट पाहत होता. त्याची नजर अधून-मधून काहीतरी शोधत असल्याचा उगाचच मला भास होत होता. एवढ्यात त्याचा मोबाईल खणाणला....
जी फर्माइए हुजूर... जी, अभी आज जाए... मै पास निकालने के लिए बोलता हूँ... त्याने शेवटचे वाक्य बोलून घाईघाईने फोन बंद केला.

त्या कोरड्या हॉलमध्ये काही क्षण दूरच्या कोपऱ्यात एक फोन खणाणला. पण फोन कोणी उचलला नाही.
माझी नजर घड्याळ्याच्या काट्यांवर होती. संध्याकाळच्या सात वाजत आल्या होत्या. साडेसात वाजता माझे पार्सल हातात मिळणार होते. तोपर्यंत मला कार्गोच्या हॉलचा रुक्षपणा सोसावा लागणार होता.
दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरील कार्गो विभाग कधी झोपतच नाही. झोपलीच तर ती ड्यूटीवर तैनात असणारी बिनाकामाची माणसं... कधी गार्ड तर कधी कारकून तर कधी सुपरवायझर...पण कार्गो चोवीस तास राष्ट्राच्या सेवेत तैनात असते. तर अशा कार्गो सेक्शनमध्ये माझी प्रतिक्षा अंतीम टप्प्यात असताना आजूबाजूला होणाऱ्या हालचाली मुकाटपणे टिपण्याचा फावल्या वेळेतला माझा धंदा तुफान फायद्यात चालला होता. दरवाजावरच्या गार्डच्या हालचालींनी मनोरंजन करुन घेतल्यानंतर काऊंटरवर बसलेल्या सरदारजीने माझे लक्ष वेधून घेतले होते.


सरदारजीने फोन ठेवताच एक किरकोळ देहयष्टीचा एक मुलगा धावत-पळत बाहेर गेला. तो बाहेर जात असल्याचे पाहून सरदारजीने बेल वाजविली. एकदा वाजविलेल्या बेलचा फारसा परिणाम झाला नाही म्हणून त्याने ती दुसऱ्यांदा वाजविली. दुसरी बेलही पहिल्याचीच झेरॉक्स कॉपी निघाल्यावर तिसऱ्यांदा त्याने बेल वाजविताच जोरात
ओए गार्डों, कानों मे क्या खुंटा गाड रखा है क्या बे ! अशी खास ठेवणीतली हाक मारली.
त्यावर दोन गार्ड धावत त्याच्याजवळ पोहोचले.
क्यूँ चिल्ला रहा है करतारे, एका गार्डने त्याला विचारले.
ओए, भेन दे टको, यहाँ का पार्सल कहाँ रख्ख दिया ओेए... त्याने त्या गार्डस् ना विचारले.
करतारे भेनचोद, गाली मत दिजो. पुँछना है तो रामपाल से पुँछ, एका गार्डने त्याला प्रत्युत्तर दिले आणि दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसले.
कार्गो विभागातील गार्ड नावाची जमात आपल्या अंडर असल्याची करतारसिंगाची समजूत आतापर्यंत गळून पडली होती. पण तरीही त्याने आवाज चढविलाच..
ओए रामपाले, किथ्थे है बे तु...
करतारसिंगचा आरडाओरडा ऐकून हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यातला रामपाल धावत त्याच्याजवळ आला.
क्या काम है करतारे.. त्याने विचारले.
ओए, इधर का पार्सल किधर रख्खा तुने
कौनसा पार्सल, रामपालने विचारले
साढेचार किलो वाला बे
अच्छा ! वह, गोडाऊन मे रख्खा है.
सुवर दे बच्चे, किस से पुँछ के रख्खा तुने. साले अब उसकी रसीद तेरा बाप काटेगा ? करतारने आख्ख्या हॉलला ऐकू जाईल एवढ्या जोरात ओरडून रामपालला जाब विचारला.
अबे हरामी की औलाद, अपनी माँ से कटवा बे रसीद. जो उखाडना है वह उखाड, तु मेरा बॉस नहीं.
लेना है तो गोडाऊन से ही लेना होगा तुझे पार्सल, रामपाल ने करड्या आवाजात सुनावले. त्याचा आवाज चढलेला पाहताच करतारसिंगने त्याच्याकडे जळजळीत नजर टाकली. पण कोणीतरी खुर्चीला बांधून टाकल्यासारखा तो फक्त त्याच्याकडे पाहतच राहिला.
पुढे काय होणार याची मला उत्सुकता लागून राहिली होती. रामपालची पाठ फिरताच करतारसिंगने मोबाईल फोन लावला.
सॉरी जी... गोडाऊन में रख्ख दिया है जी... जी, अभी तो रसीद बनेगी साब... जी मार्केट रेट से बनेगा...
सॉरी करना जी... ना जी ना... अगली बार ध्यान रख्खेंगे... त्याने दीर्घ श्वास घेऊन मोबाईल बंद केला.
तेवढ्यात तो किरकोळ देहयष्टीचा पोऱ्या करतारसिंगजवळ आला.
जी पास का क्या करना है जी. त्याने विचारले
ओए, मुझे क्या पुछता है. फाड के फेंक दे. संताप गिळत करतार जवळपास ओरडलाच.
तेवढ्यात रामपाल माझ्याकडे येताना दिसला.
मी उभा राहिलो. घड्याळात साडेसात वाजलेल्या होत्या.
जी आप का पार्सल, रामपाल ने एका पावतीवर माझी सही घेतली आणि तो लिफाफा माझ्या हातात दिला. मी खिशात हात घातले आणि पन्नासची एक नोट रामपालच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला.
जी नहीं साब, मै सॅलरी में ही खुश हूँ, रामपाल म्हणाला.
मी वरमलो आणि बाहेर निघालेली ती नोट पुन्हा खिशात गेली.

रामपालची पाठ फिरण्यापुर्वी मी विचारले, जी, कब से देख रहाँ हूँ, सरदार क्यूँ भडक रहा था.
रामपाल किंचित हसला, चोर साला, साडे चार किलो का सोना भेज रहा था जी बिना रसीद के. कम से कम दो पर्सेंट के हिसाब से रसीद बनती सर, अगर मै गोडाऊन मे नहीं रखता तो. उसको एक पर्सेंट मिल जाता कुछ लाख रुपए... सरकार का नमक खाता हूँ, पैसा थोडे ही डुबने दूँगा... रामपाल म्हणाला.
मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्याची पाठ फिरताच मी पण कार्गोच्या बाहेर निघालो. सेक्युरीटी गेट ओलांडून बाहेर पडताना साडेचार किलो सोन्याची मार्केट व्हॅल्यू आणि त्याची दोन टक्क्यांनी होणारी रसीद किती रुपयांची असेल आणि करतारसिंगाचे किती पैसे बुडाले याचा हिशोब माझ्या मनात सुरू होता....

( क्रमशः )