शनिवार, ८ डिसेंबर, २०१२

बातमीचे ओझे



( काही अपरिहार्य कारणांमुळे यातील काही पात्रे आणि प्रसंग यात थोडाफार बदल केला आहे. )
टिव्हीच्या धंद्यात डेस्कवाल्यांना फिल्डवर जाऊन बातम्या कव्हर कराव्याच लागतात असे मुळीच नाही. आजकाल तो ट्रेंड रुजला असला तरी हैद्राबादला ई टिव्ही मराठीच्या सुवर्णकाळात फिल्डवर जाऊन बातम्या कव्हर करण्याची संधी मिळणे म्हणजे डेस्कवाल्यांसाठी पर्वणीच असायची. अर्थात कोण कोण कुणाचा पठ्ठ्या आहे अगर कुणाच्या डोक्यावर कोणाचा हात आहे यावरुन कुणी बाहेर जायचे आणि कुणी आत बसायचे हे ठरायचे. असो. हि सर्व प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे डेस्कवाल्यांना कधीकधी डोळसपणे बाहेर पडणे कसे आवश्यक आहे हे सांगणारा किस्सा मला तुमच्यापुढे मांडायचा आहे. धंदा बातमीचा, तसा जोखमीचा त्यामुळे जरासी सावधानी महत्त्वाची असतेच...नाहीतर अनेकदा मानेवर अनामिक ओझे उभा राहते जे तुम्ही कधीच उतरवू शकत नाही.
ई व्ही मराठीच्या हैद्राबाद कार्यालयात राज्यातील सर्व टूएमबी सेंटर्स जोडली गेल्यानंतरच्या काळात खऱ्या अर्थाने न्यूजरुमचे वारे संचारले. एरव्ही कोसलाईट हाऊस अंधेरी येथील कार्यालयातून संचलित होणारा ममा ( महाराष्ट्र माझा ) हैद्राबादला आल्यावर प्रचंड गतीमान झाला. त्यामुळे अर्थातच सर्वात विश्वासार्ह बातमीपत्र म्हणून महाराष्ट्र माझाचा गवगवा झाला. याचे श्रेय मेघराज पाटील यांना जेवढे देता येईल तेवढेच या बातमीपत्रावर जीवापाड प्रेम करणारे बुलेटीन प्रोड्यूसर्स, पॅनेर प्रोड्युसर्स आणि अँकर्स यांना द्यावे लागेल. संध्याकाळचा महाराष्ट्र माझा प्रचंड लोकप्रिय ठरल्यावर सकाळचा महाराष्ट्र माझा काढण्याची कल्पना डेस्कवर रुजली आणि ती पाहता-पाहता अंमलात आणलीही गेली. सकाळचे पहिले बातमीपत्र काढण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे पुढचे काही दिवस माझी नाईट शिफ्ट लागणार हे निश्चित होते आणि झालेही तसेच.
बातमीपत्र सुरू होईन एक-दीड आठवडा झाला असेल. एक सुत्र ठरले होते. ते म्हणजे संध्याकाळच्या बातमीपत्रातून रिजेक्ट झालेल्या स्टोरीज सकाळी कॅरी केल्या जातील. त्यानुसार रात्री साडे-अकरा वाजता डेस्कवर पोहोचताच एक भेंडोळे हाती येत असे त्या भेंडोळ्यात संध्याकाळच्या ममाच्या प्रोड्युसरने दिलेल्या सूचना आणि नाकारलेल्या बातम्यांच्या स्क्रिप्ट यांचा समावेश असायचा. त्यादिवशी मी डेस्कवर आलो. नेहमीप्रमाणे ते भेंडोळे हाती घेतले आणि एक-एक बातमी पाहत स्क्रीप्ट बाजूला ठेऊ लागलो. लातूरहून आलेल्या एका बातमीच्या हेडींगने माझे लक्ष वेधून घेतले. आमचा लातूरचा स्ट्रींजर आनंद गायकवाड ने पाठविलेली ती स्टोरी होती. एका दलित मुलावर गावातील सवर्ण मुलांनी बलात्कार केला अशी ती स्टोरी... 

आनंदने लिहिलेल्या स्टोरीनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही नोंद झाला होता. हि बातमी रिजेक्ट झाल्याचे मला आश्चर्य वाटले. मी पुन्हा एकदा ती नजरेखालून घातली.
आनंदने लिहिले होते की, गावातील चार सवर्ण मुलांनी त्या मुलाला मारहाण केली आणि त्यानंतर कंडोमचा वापर करुन त्याच्याशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेनंतर भेदरलेल्या त्या मुलाने आपल्या पालकांसह पोलीस स्टेशन गाठले आणि त्या सवर्ण मुलांच्या विरोधात केस दाखल केली. पोलीसांनी केस दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली. पण पत्रकारांच्या रेट्यानंतर नंतर केस दाखल करुन घेण्यात आली. आणि मुलाचे वैद्यकीय केले असता त्याच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. घटना घडल्यानंतरच तीन-चार दिवसांनी त्याने ही बातमी केली होती. त्या स्टोरीमध्ये कंडोम, संभोग , वीर्य असे सहजासहजी वापरता न येणारे शब्द आनंदने वापरले होते. संध्याकाळच्या बातमीपत्रास एक मॅडम असल्याने हे शब्द वाचून त्यांनी ती स्टोरी न वापरता सकाळच्या बातमीपत्रासाठी फॉरवर्ड केली होती.
ही स्टोरी संध्याकाळच्या बातमीपत्रातून रिजेक्ट होऊ शकते ही बाब मुळात मनाला पटणारी नव्हती. मीच काय पण मराठवाड्यातील दलित अत्याचाराच्या घटनांची ज्याला माहिती आहे तो कोणताच व्यक्ती ही बातमी रिजेक्ट करण्यास धजावणे शक्यच नव्हते. कदाचित नजरचुकीने राहीली असावी म्हणून त्या बातमीवर ही बातमी संध्याकाळच्या बातमीपत्रातच वापरावी असा शेरा लिहून पुन्हा संध्याकाळच्या बातमपत्रासाठी पाठविली. त्या दिवशीचे सकाळचे बातमीपत्र प्रसारीत झाल्यावर आणि माझी शिफ्ट संपल्यावर मी निघून गेलो. जाताना मला ती बातमी संध्याकाळच्या बातमीपत्रात दिसेल अशी आशा होती. नाईट-शिफ्ट केल्यानंतर दिवसाची झोप झाल्यावर संध्याकाळी सातचे बातमीपत्र पाहणे हा शिरस्ता होता. त्यादिवशी काही कारणांमुळे मला संध्याकाळचे बातमीपत्र पाहता आले नाही. पण ती बातमी डोक्यात होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी साडेअकरा वाजता डेस्कवर हजर होताच ते भेंडोळे मी हाती घेतले.

 भेंडोळे उघडण्यापुर्वीच एक निरोप मिळाला, बॉसला फोन करा.    
मी फोन केला. माझा फोन जाताच पलिकडून बॉसने विचारले.
गिरीश, तुम्ही ती लातूरची रेपकेसची बातमी फॉरवर्ड का केलीत ? इति बॉस
सर, ती दलित अत्याचारासंदर्भातील बातमी होती. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील म्हणून
पण तुम्ही ती स्क्रीप्ट वाचलीत.- 
होय
एक महिला संध्याकाळच्या बातमीपत्राला आहे तरीही तुम्ही ती फॉरवर्ड केलीत ?
माफ करा पण ती स्क्रीप्ट सुधारून घेता आली असती
मग तुम्ही का सुधारुन वापरली नाही
कारण ती संध्याकाळीच वापरल्यास ती अधिक परिणामकारक होईल असे मला वाटले.
फालतू कारणे सांगू नका. आज सकाळी तुम्ही ती कुठेतरी वापरुन टाका छोटीशी फोनवरुनही बॉस चिडलेला आहे ते जाणवत होते.
छोटी ? का सर..
हे पहा गिरीश, याचे खुप मोठे महाभारत झालेय. स्टोरी छोटीच वापरा...  बॉसचा फायनल आदेश झाला.
ओके.  मी फोन ठेवला.
फोनवर बोलून झाल्यावर मी भेंडोळे सोडून ती स्क्रीप्ट वाचायला घेतली. त्यावर अनेक निळ्या, लाल आणि हिरव्या शाईंच्या पेनांनी संपादकीय संस्कार केले होते. अखेर त्या संस्कारातून एक नवीच स्क्रीप्ट तयार झाली होती. आणि तिचा साईजही लक्षणीयरित्या घटला होता. एका मुलावर बलात्कार झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आणि पोलीस तपास करीत आहेत अशा आशयाची ती बातमी तयार झाली होती. त्यातला तो मुलगा दलित असल्याचा आणि त्यावर सवर्णांनी अत्याचार केल्याचा आशय पुर्णपणे हद्दपार झाला होता. मी पुन्हा बॉसला फोन लावला 

बॉस, मी बोलतोय
बोला, त्या बातमीबद्दलच का
होय. तीचा आशयच पुर्णपणे बदलून गेलाय.
मीच केलेय ते
पण
हे बघा, आपल्याला दंगली पेटवायच्या नाहीत
पण त्या मुलाला किमान न्याय तरी देऊ शकतो की नाही आपण
मला एक सांगा, बॉस कोण आहे तुम्ही की मी ? बॉसने अखेर ठेवणीतील अस्त्र काढले.
ठिक आहे. जशी तुमची इच्छा... मी फोन खाली ठेऊन दिला.
दुपारच्या शिफ्टची माणसे निघून गेल्यावर मी आनंदला फोन लावला
आनंद...
बोला साहेब, पलिकडून आनंदचा पेंगुळलेल्या स्वरात प्रतिसाद आला
अरे त्या रेपकेससंदर्भात पुढे काय झाले का
काय साहेब, तुम्ही लावली नाहीत ती बातमी आनंद ने तक्रार केली.
आज घेतोय. सकाळच्या बातमीपत्रात. तुम्ही जरा पुढे काय घडलं त्याची माहिती घ्या.
ओके सर, आनंदने फोन ठेवला.
एका नव्या कॉपी एडीटरकडे स्क्रीप्ट देऊन मी बुलेटीन अरेंज करण्याच्या कामात गढून गेलो.
रनऑर्डर तयार झाल्यावर सकाळी सहा वाजता मी पुन्हा एकदा आनंदला फोन लावला.
आनंद, सकाळचे सहा वाजत आहेत. काही माहिती मिलाली का
माफी असावी साहेब. मी माहिती घेतो. आनंदने उत्तर दिले.
ठिक आहे. मोंताज पडल्यावरच आनंद माहिती देतो का असे म्हणत मी फोन ठेवला.
खरेतर त्या मुलाचे पुढे काय झाले याची मला उत्सुकता लागून राहिली होती.  
पंधरा मिनिटांतच आनंदचा फोन आला.
साहेब, अपडेट आहे.
काय झाले मी उत्सुकतेने विचारले
त्या मुलाने आत्महत्या केली. आनंदने एका दमात सांगितले.
काय ? मी जवळपास ओरडलोच.
यापेक्षा वाईट म्हणजे, त्याच्या पालकांनी केस मागे घेतलीय आणि ते गाव सोडून पुण्याला निघून गेलेत परत न येण्यासाठी....
मग आता काय करायचं मी विचारलं.
तुम्हीच ठरवा असं म्हणून त्याने तो फोन ठेऊन दिला. 
 मी काय ठरविणार ? तेवढ्यात मोंताज पडला आणि बातमीपत्र सुरू झाले. सुदैवाने की दुर्दैवाने त्या दिवसी जाहिराती जास्त असल्याने ती बातमी एअर झालीच नाही. मी पुन्हा त्या स्क्रीप्टवर झालेली अपडेट लिहीली. पुढे जोपर्यंत मी नाईट-शिफ्टला होतो तोपर्यंत मी त्या बातमीची पुढची बातमी येईल याची वाट पाहिली. पण ती बातमी आलीच नाही. आजही डेस्कच्या लाल फितीत अडकलेल्या त्या बातमीची आठवण झाली की मन बेचैन होते. एका कुटुंबाला न्याय न देऊ शकल्याची बोच लागते. त्याहीपेक्षा एका लायक बातमीची हेळसांड झाल्याचे ओझे मनावर आहे त्याचा भार असह्य होतो हे सर्वात वेदनादायी..... माझ्यासाठी आणि आनंदसाठीही.... बॉस आणि त्या मॅडमच्या मनाचे काय ते माहित नाही...! 

सोमवार, २५ जून, २०१२

हिशोब - 2



रामपालने सांगितलेला सोन्याचा हिशोब माझ्या डोक्यात घोळत होता. खरंच गेल्या काही वर्षात सोनं किती महागलं नाही का मी स्वतःशीच पुटपुटलो.ज्यावेळी सोनं स्वस्त होतं त्यावेळी पगार च्या मारी फक्त पाच-सहा हजारच होता. त्यावेळी पैसे कुठे गुंतवावे ते कळतही नव्हतं.हैद्राबादच्या त्या थिएटरांत किमान साठ-सत्तर हजार रुपये सिनेमा पाहण्यासाठी खर्च केले असतील. तेलूगू चित्रपट कळायचे नाहीत. शेजारचे हसले की आपणही हसायचं आणि त्यांनी टाळ्या-शिट्टया मारल्या कि आपणही तसं करायचं. एवढा अट्टाहास कशासाठी तर तेलुगू शिकण्यासाठी एवढं सगळं करुनही तेलुगू शिकलो किती तर
नी पेरियन्टी बाबू ( बाळ, तुझे ना काय ? ), वक्कटी ते पदी ( एक ते दहा ) आणि काही निवडक भाज्यांची नावे. लोक इंग्रजी फाड-फाड बोलण्यासाठी महागडी शिकवणी लावतात. मी तेलुगू शिकण्यासाठी लावलेल्या या अनोख्या शिकवणीचा समावेश सर्वात महागडी शिकवणी या टॅगखाली नक्कीच गिनीच बुकात होईल असं उगाचच मला वाटून गेलं.. यातली गंमत लक्षात येताच थोडं हसूही आलं. ....
जवळपास दहा हजार रुपये तोळा म्हणजे साठ हजारांत सहा तोळे सोनं आलं असतं आणि आता सहा तोळे म्हणजे जवळपास दोन लाख रुपये, चुकलंच आपलं... मी स्वतःशीच पुटपुटत कार्गोच्या बाहेर पडलो. बाहेर बराच अंधार झाला होता. उन्हाळा नुकताच सुरू झाला असला तरी दिवस मोठा आणि रात्र छोटी होण्यास केंव्हाच सुरूवात झाली होती. मी बाहेर आलो त्यावेळी साडेनऊ होत आल्या होत्या. म्हणजे मी तब्बल दीड तास आत होतो. कार्गोच्या ऑफीसच्या बाहेरची गर्दी अदृश्य झालीच होती एव्हाना.एखाद-दुसरा माणूस आणि तशीच एखादी गाडी रस्त्याने धावताना दिसत होती. बहुतेक आपण अडकलो की काय असं वाटू लागलं. खरं म्हणजे मी अडकलोच होतो. कारण त्या परिसरातला बसचा थांबा माझ्या उपयोगाचा नव्हताच. दुसरं म्हणजे रात्री बसची फ्रिक्वन्सी खुपच कमी असते हे मला माहित होतं. त्यामुळे आता किती वेळ थांबावे लागेल कुणास ठाऊक असा विचार करीत मी बस स्टॉपच्या जवळ अॅटो रिक्षाचा चान्स घेण्यासाठी उभा राहिलो. दिल्ली शहर देशाची राजधानी जरी असले तरी जसा राज्यकर्ते आणि जनतेमध्ये कम्युनिकेशन गॅप नेहमीच राहतो तसा दिल्लीतील दळणवळण यंत्रणेतला हा गॅप आचंद्रसूर्य राहिल. या शहरात तुम्हाला एकतर बस वेळेवर मिळत नाही. मिळाली तर ती तिचा मार्ग कधी बदलला असेल हे तुम्हाला तुमचा स्टॉप येईनासा होईपर्यंत कळत नाही. जेंव्हा कळते तेंव्हा कंडक्टरची खाटी हरियाणवी बोलीतली शेलकी विशेषणे ऐकत उतरण्याचा बाका प्रसंग अनेकदा गुदरतो. या सर्व भन्नाट गोष्टींमुळे रिक्शाला पसंती देत असाल तर येथील चालकांना गरज कुणाला आहे हे बरोबर कळतं. त्यानुसार ते भाडंही आकारतात. रिक्शाचा मीटर त्यांच्या मर्जीप्रमाणे आणि टेरीफ तुमच्या खिशाला मोठं भगदाड पाडणारा ठरतो असा माझा आजवरचा अनुभव. हे सगळे दिव्य अनुभव जमेस धरुन देखील मी आयत्यावेळेचा विषय म्हणून जवळपास दहा मिनिटे स्टॉपवर उभा होतो. दुरून एक रिक्शा येताना दिसला रिक्शावाल्याला मी दिसावे म्हणून निम्म्या रस्त्यात येईन मी त्याला हात करु लागलो. पण लेकाचा नाकासमोर बघून रिक्शा चालवणारा प्राणी निघाल्याने तो सरळ पुढे निघून गेला आणि जाता-जाता माझ्या नशीबी एक मोठी प्रतीक्षा टाकून गेला. आता काय करावं या वंचनेत असतानाच एक लक्झरी कार माझ्यासमोरुन गेली. गाडीला हात करावा की नको अशा बुचकाळ्यात मेंदू असताना शरीराने मात्र काम चोख बजावले.  गाडी समोरून जात असतानाच लिफ्टची खुण हाताने केली. त्याचबरोबर भरधाव वेगात असणारी ती गाडी सुमारे दोनशे मीटर जाऊन थांबली आणि लागलीच रिव्हर्स गिअरमध्ये मागे येऊन माझ्यासमोर थांबली. खिडकीचा काच खाली घेऊन आतल्या व्यक्तीने आत ये अशी खुण केली. ध्यानी-मनी नसताना मिळालेली लिफ्ट थोड्या साशंक मनानेच स्वीकारत मी आत जाऊन बसलो. 'सो यंग मॅन... किसी जमाने मे मै भी यहाँ ऐसे ही अटका थी. तुम्हें देखकर पुरानी यादें ताजा हो गयी...' तो म्हणाला.  'कहाँ जाओगे..?  'जाना तो व्दारका है...अगर आप का रुट किसी और जगह का है तो इन्सानों की बस्ती तक तो छोड ही दिजीए..' मी म्हणालो. माझ्या उत्तरावर तो खळखळून हसला. 'बहोत खुब ! लेकीन मेरे भाई, दिल्ली में इन्सान बसते कहाँ है, यहाँ तो साले पॉलीटीशीयन बसते है.' आपणच केलेल्या विनोदावर तो पुन्हा एकदा खळखळून हसला. 'बाय द वे ! बंदे को *रवीश खुराना* कहते है.' त्याने स्वतःची ओळख करुन दिली.
'जी मै गिरीश'
मराठी हो... 'त्याने विचारले
जी हाँ, आपने कैसे पहचाना ?
' तुम्हारा  पार्सल औरंगाबाद से आया है न् इसिलिए अंदाजा लगाया, करेक्ट.पहचान गया ना ?' तो म्हणाला. समोरुन आडव्या आलेल्या इंडिगोला चुकवित त्याने एक शेलकी शिवी हासडली आणि म्हणाला,  ये देखो दिल्ली के सो कॉल्ड डिसिप्लीनड् पीपल्स... बुलशीट.... सालों को डिसीप्लीन सीखना हो तो महाराष्ट्रा में भेजना चाहीए.... गँवार साले.... यार गिरीश अपन को तो मुंबई बडा ही अच्छा लगता है और उस के बाद नासिक...  
जी अच्छी सिटी है नासिक' मी म्हणालो. 'वैसे आप क्या करते है, कोई बिझनेस ? ' मी उत्सुकतेने विचारले.
'बिझनेस ?' तो हसला...' ऐसा ही समझ लो...' त्याने उत्तर दिले.
माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळाचे भाव पाहताच तो म्हणाला. ऐसा है की मै हूँ चावल का व्यापारी. देश के सबसे बडे दलालों में से एक... किसान अनाज उगाता है. मंत्री उसकी किंमत तय करता है. ब्यापारी खरीदता और बेचता है और हम जैसे दलाल उसका बाजार डिसाईड करते है. करोडो कमाता हूँ बिना कुछ किए और बिना कुछ गँवाए... यू कॅन से मी बास्टर्ड' स्वतःच केलेल्या या टिपण्णीवर तो पुन्हा एकदा हसला.
'वैसे तुम क्या करते हो भाई,' त्याने विचारले .
'जी मै पत्रकार हूँ ' मी उत्तर दिले
क्या बात है, अरे मै तो एक्स्पोज हो गया... तो पुन्हा हसला अच्छा भाई, मिलकर खुशी हुई... त्याने समोर मेट्रो स्टेशन दाखविले.
अरे सर, थँक्यू.... मी त्याचे आभार मानून गाडीतून खाली उतरलो.
गाडीची काच बंद करण्यापुर्वी त्याने आपले कार्ड माझ्याकडे दिले, 'हराम का खाता हूँ, हराम की पीता भी हूँ लेकीन दोस्ती निभाता हूँ दोस्त... जिुंदगी जीता हूँ....अपना हिसाबही कुछ ऐसा है.... टच मे रहना जरुर... शब्बाखैर...' तो म्हणाला.
 मी त्याच्याकडे पाहून फक्त हसलो. गाडीची काच बंद झाली. आणि काही क्षणातच तो तेथून निघून गेला.
 (क्रमशः)
* या पात्राचे नाव संबंधिताच्या इच्छेनुसार बदलले आहे, याची कृपया नोंद घ्यावी.


रविवार, १० जून, २०१२

हिशोब


एअर इंडियाच्या कार्गो सेक्शनमधील त्या तुटक्या काऊंटरवर बसलेला सरदार अधूमधून मिशीला पीळ देत कुणाची तरी वाट पाहत होता. त्याची नजर अधून-मधून काहीतरी शोधत असल्याचा उगाचच मला भास होत होता. एवढ्यात त्याचा मोबाईल खणाणला....
जी फर्माइए हुजूर... जी, अभी आज जाए... मै पास निकालने के लिए बोलता हूँ... त्याने शेवटचे वाक्य बोलून घाईघाईने फोन बंद केला.

त्या कोरड्या हॉलमध्ये काही क्षण दूरच्या कोपऱ्यात एक फोन खणाणला. पण फोन कोणी उचलला नाही.
माझी नजर घड्याळ्याच्या काट्यांवर होती. संध्याकाळच्या सात वाजत आल्या होत्या. साडेसात वाजता माझे पार्सल हातात मिळणार होते. तोपर्यंत मला कार्गोच्या हॉलचा रुक्षपणा सोसावा लागणार होता.
दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरील कार्गो विभाग कधी झोपतच नाही. झोपलीच तर ती ड्यूटीवर तैनात असणारी बिनाकामाची माणसं... कधी गार्ड तर कधी कारकून तर कधी सुपरवायझर...पण कार्गो चोवीस तास राष्ट्राच्या सेवेत तैनात असते. तर अशा कार्गो सेक्शनमध्ये माझी प्रतिक्षा अंतीम टप्प्यात असताना आजूबाजूला होणाऱ्या हालचाली मुकाटपणे टिपण्याचा फावल्या वेळेतला माझा धंदा तुफान फायद्यात चालला होता. दरवाजावरच्या गार्डच्या हालचालींनी मनोरंजन करुन घेतल्यानंतर काऊंटरवर बसलेल्या सरदारजीने माझे लक्ष वेधून घेतले होते.


सरदारजीने फोन ठेवताच एक किरकोळ देहयष्टीचा एक मुलगा धावत-पळत बाहेर गेला. तो बाहेर जात असल्याचे पाहून सरदारजीने बेल वाजविली. एकदा वाजविलेल्या बेलचा फारसा परिणाम झाला नाही म्हणून त्याने ती दुसऱ्यांदा वाजविली. दुसरी बेलही पहिल्याचीच झेरॉक्स कॉपी निघाल्यावर तिसऱ्यांदा त्याने बेल वाजविताच जोरात
ओए गार्डों, कानों मे क्या खुंटा गाड रखा है क्या बे ! अशी खास ठेवणीतली हाक मारली.
त्यावर दोन गार्ड धावत त्याच्याजवळ पोहोचले.
क्यूँ चिल्ला रहा है करतारे, एका गार्डने त्याला विचारले.
ओए, भेन दे टको, यहाँ का पार्सल कहाँ रख्ख दिया ओेए... त्याने त्या गार्डस् ना विचारले.
करतारे भेनचोद, गाली मत दिजो. पुँछना है तो रामपाल से पुँछ, एका गार्डने त्याला प्रत्युत्तर दिले आणि दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसले.
कार्गो विभागातील गार्ड नावाची जमात आपल्या अंडर असल्याची करतारसिंगाची समजूत आतापर्यंत गळून पडली होती. पण तरीही त्याने आवाज चढविलाच..
ओए रामपाले, किथ्थे है बे तु...
करतारसिंगचा आरडाओरडा ऐकून हॉलच्या दुसऱ्या कोपऱ्यातला रामपाल धावत त्याच्याजवळ आला.
क्या काम है करतारे.. त्याने विचारले.
ओए, इधर का पार्सल किधर रख्खा तुने
कौनसा पार्सल, रामपालने विचारले
साढेचार किलो वाला बे
अच्छा ! वह, गोडाऊन मे रख्खा है.
सुवर दे बच्चे, किस से पुँछ के रख्खा तुने. साले अब उसकी रसीद तेरा बाप काटेगा ? करतारने आख्ख्या हॉलला ऐकू जाईल एवढ्या जोरात ओरडून रामपालला जाब विचारला.
अबे हरामी की औलाद, अपनी माँ से कटवा बे रसीद. जो उखाडना है वह उखाड, तु मेरा बॉस नहीं.
लेना है तो गोडाऊन से ही लेना होगा तुझे पार्सल, रामपाल ने करड्या आवाजात सुनावले. त्याचा आवाज चढलेला पाहताच करतारसिंगने त्याच्याकडे जळजळीत नजर टाकली. पण कोणीतरी खुर्चीला बांधून टाकल्यासारखा तो फक्त त्याच्याकडे पाहतच राहिला.
पुढे काय होणार याची मला उत्सुकता लागून राहिली होती. रामपालची पाठ फिरताच करतारसिंगने मोबाईल फोन लावला.
सॉरी जी... गोडाऊन में रख्ख दिया है जी... जी, अभी तो रसीद बनेगी साब... जी मार्केट रेट से बनेगा...
सॉरी करना जी... ना जी ना... अगली बार ध्यान रख्खेंगे... त्याने दीर्घ श्वास घेऊन मोबाईल बंद केला.
तेवढ्यात तो किरकोळ देहयष्टीचा पोऱ्या करतारसिंगजवळ आला.
जी पास का क्या करना है जी. त्याने विचारले
ओए, मुझे क्या पुछता है. फाड के फेंक दे. संताप गिळत करतार जवळपास ओरडलाच.
तेवढ्यात रामपाल माझ्याकडे येताना दिसला.
मी उभा राहिलो. घड्याळात साडेसात वाजलेल्या होत्या.
जी आप का पार्सल, रामपाल ने एका पावतीवर माझी सही घेतली आणि तो लिफाफा माझ्या हातात दिला. मी खिशात हात घातले आणि पन्नासची एक नोट रामपालच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला.
जी नहीं साब, मै सॅलरी में ही खुश हूँ, रामपाल म्हणाला.
मी वरमलो आणि बाहेर निघालेली ती नोट पुन्हा खिशात गेली.

रामपालची पाठ फिरण्यापुर्वी मी विचारले, जी, कब से देख रहाँ हूँ, सरदार क्यूँ भडक रहा था.
रामपाल किंचित हसला, चोर साला, साडे चार किलो का सोना भेज रहा था जी बिना रसीद के. कम से कम दो पर्सेंट के हिसाब से रसीद बनती सर, अगर मै गोडाऊन मे नहीं रखता तो. उसको एक पर्सेंट मिल जाता कुछ लाख रुपए... सरकार का नमक खाता हूँ, पैसा थोडे ही डुबने दूँगा... रामपाल म्हणाला.
मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. त्याची पाठ फिरताच मी पण कार्गोच्या बाहेर निघालो. सेक्युरीटी गेट ओलांडून बाहेर पडताना साडेचार किलो सोन्याची मार्केट व्हॅल्यू आणि त्याची दोन टक्क्यांनी होणारी रसीद किती रुपयांची असेल आणि करतारसिंगाचे किती पैसे बुडाले याचा हिशोब माझ्या मनात सुरू होता....

( क्रमशः )

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

दिल्लीची 'छाया'..

दिल्लीच्या कुप्रसिद्ध अशा जी. बी. रोड या रेड लाईट एरियात मी लुबाडला गेलो होतो. पण केवळ दैव बलवत्तर म्हणून तिथल्या गुंडांच्या तावडीतून बचावलो देखील. आता त्या परिसरातील गुंडांच्या कित्येक कथा मी वर्तमानपत्रे आणि पत्रकारांकडून ऐकल्या आहेत. या कथा ऐकताना आणि वाचताना शहरांतला माझा पहिला दिवस मला आठवतो.


दिल्ली..... या शहराच्या प्रत्येक गल्लीत एक कहाणी आहे. यातील प्रत्येक कहाणी तुमच्या आसपास फिरणारी असते. ती तुम्हाला बिना अपॉईंटमेंट भेटूनही जाते. जाता-जाता न दिसणारी एक छाप सोडून जाते. असा खोल शिक्का उमटविणारी ही कहाणी तुम्ही पुढे विसरण्याची शक्यता तशी कमीच असते. ती आयुष्यभर लक्षात राहते. दिल अर्थात हृद्य ताब्यात घेणारं हे शहर दिलवालों का शहर म्हणून ओळखलं जातं ते यासाठीच.... या शहरात पाऊल ठेवला त्याच दिवशी अशीच एक कहाणी अचानक माझ्या समोर आली. तिचा न मिटणारा शिक्का अजूनही माझ्या मनावर जसाच्या तसा आहे.
पत्रकार म्हणून माझी या शहरात माझी दुसरी इनिंग सुरू होणार होती. मराठी राष्ट्रपतींची निवड होण्याची चाहूल लागलेला हा काळ...उत्साह, आत्मविश्वास आणि किंचित धाकधूक अशा संमिश्र भावनांची गर्दी घेऊन या शहरात मी दुसऱ्या दिवसापासून फिरणार होतो. नव्या ओळखी, नवे सोर्स, नवे सहकारी इ. इ. जमविणार होतो.


संध्याकाळी साडेसात वाजता नवी दिल्ली स्टेशनवरील प्रवाशांतून वाट काढत दुस-या बाजूने बाहेर पडताच शहराच्या अनोळखी गर्दीत माझे आपसूक स्वागत झाले. छोट्या गावातील शुक्रवारच्या बाजारात गर्दी पाहणारा मी तसा प्रत्येक शहराच्या गर्दीला एव्हाना सरावलो होतोच. मुंबईची बिनचेहऱ्याची, हैद्राबादची तेलुगू अस्मिता जोपासणारी अशी गर्दीची विविध रुपे मला माहित होती. त्यामुळे दिल्लीची गर्दी अऩुभविण्याची माझी पहिली वेळ असली तरी मी घाबरलो अथवा भांबावलो नव्हतो. अर्थात या अनोळखी गर्दीत माझी ओळख निर्माण करण्याचे आव्हान मी स्वीकारले होते.
गर्दीतून वाट काढत टॅक्सी स्टँडवर जाताच माझ्या लॉजवर पोहोचविणारी गाडी माझ्या पुढ्यात आली. ड्रायव्हरने अर्ध्या तासाच्या आत मला मुक्कामी पोहोचते केले. शहरातल हा माझा पहिलाच दिवस असल्याने बाहेर खाण्याशिवाय मला दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे तासभर लॉजवर थांबून हॉटेल शोधण्यासाठी मी बाहेर पडलो.
लॉजच्या बाहेर आलो तेंव्हा रात्रीच्या सव्वानऊ झाल्या होत्या. रस्ता माहित नसल्याने सायकल रिक्षाचा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्याय अर्थातच नव्हता. समोरुन आलेल्या रिक्षाला हात करुन मी त्याला एखाद्या हॉटेलकडे नेण्यास सांगितले.
क्या खाओगे ? त्याने विचारले.
कुछ भी, अभी तो भुख लगी है जो मिलेगा वह चलेगा. मी म्हटले.
थोड्याच वेळात एका मळकट हॉटेलसमोर त्याने रिक्षा थांबविला.
कितना ? मी विचारले.
चालीस रुपया साहब, त्याने भाडे सांगितले.
आढेवेढे घेण्याचा प्रश्नच नव्हता. याचे कारण म्हणजे एकतर दर माहित नव्हते आणि दुसरे म्हणजे भाडे ठरविले नव्हते. त्याने सांगितलेले भाडे देऊन मी त्या कळकट हॉटेलात शिरलो. मिळेल ते खाऊन तासाभराने तेथून बाहेर पडलो. पण तोपर्यंत रस्त्यावरची गर्दी विरळ झाली होती. सायकल रिक्षा कुठेच दिसत नव्हता. लॉजचे नाव माहित असल्याने आणि येताना थोडाफार रस्ता लक्षात ठेवल्याने अखेर चालतच हॉटेल गाठण्याचे ठरविले. या शहराची आणखी एक खासियत म्हणजे तुम्ही नवीन असाल तर ते इकडच्या लोकांच्या चटकन लक्षात येते आणि त्यानंतर तुम्हाला किमान एक मैल जास्तीची रपेट घडविण्यात त्यांना आनंद वाटतो. माझ्या बाबतीतही तसेच झाले.
रस्ता माहित नसल्यामुळे समोरुन येणाऱ्या बऱ्यापैकी दिसणा-या एका तरुणाला मी रस्ता विचारला. खांद्यावरची ऑफीस बॅग सावरत त्याने माझ्याकडे पाहिले आणि विचारले,
नए हो क्या ?
आजही आया हूँ. रस्ता बताओगे तो मेहरबानी होगी. मी त्याला विनंती केली.
तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, भाई, चोर-उचक्के होते है इस रास्ते पर. जरा संभलके चलो. त्यानंतर त्याने रस्ता सांगायला सुरूवात केली. त्याने मार्गदर्शन केल्याप्रमाणे चालतच मी लॉज शोधत निघालो. साधारणतः वीस मिनिटांच्या पायतोडीनंतरही लॉज मिळाला नाही आणि आपण रस्ता चुकलो हे तत्काळ लक्षात आले. पण तोपर्यंत बराच वेळ झाला होता. अखेर पुन्हा तेच ठिकाण गाठण्याचा निर्णय़ घेतला. आलेल्या रस्त्याने परत जात असताना निम्म्या रस्त्यात तोच तरुण पुन्हा दिसला. माझ्याकडे लक्ष जाताच त्याने विचारले.
भाई, क्या हुवा, रस्ता नहीं मिला ?
नया हूँ ना, इसलिए भूल गया. मी त्याला उत्तर दिले.
कोई नहीँ जी, मै पहूँचा देता हूँ. वहींसे जाना है मुझे त्याने सुचविले.
दुसरा पर्याय दिसत नसल्याने मी पण त्याच्या या प्रस्तावाला होकार दिला.
दिल्ली के नहीं लगते, साऊथ इंडियन हो क्या ? त्याने विचारले.
हाँ, हैद्राबाद से हूँ. मी त्याला सांगितले.
हैद्राबादी बिर्याणी अच्छी लगती है. तो म्हणाला.
हं... रस्ता हरविल्यामुळे थोडी धाकधूक होऊ लागली होती. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे माझे फारसे लक्ष नव्हतेच.
भाई, इस गली से आगे निकलते है. मेरा घर है वहाँ पे. बैग रखता हूँ और फिर आगे चलेंगे. तो म्हणाला.
जी, क्यूँ नहीं. जरुर. मी उत्तर दिले.
पन्नासेक मीटर अंतर चालून गेल्यावर एका गल्लीत तो वळला. आत जावे की नाही याचा विचार करत मी तेथेच थांबलो. मला थांबलेले पाहून तो म्हणाला, आईए, कोई नहीं. बैग रखकर आगे निकल जाएंगे. यात गैर काहीच नव्हते. त्यामुळे मी पण त्याच्या मागे-मागे निघालो. पुढे जाऊ तशी ती गल्ली अधिकच अरुंद होऊ लागली. खिडक्यांतून काही डोळे माझ्याकडे पाहत असल्याचा उगाचच भास होऊ लागला. गल्ली क्रॉस केल्यावर थोड्याच वेळात आपण लॉजवर पोहोचू असा स्वतःलाच दिलासा देत मी त्या तरुणाच्या मागे मागे जात होतो. एवढ्यात तो एका घरासमोर थांबला. समोरच्या अरुंद जिन्यातून तो वर चढू लागला. मी गोंधळून तेथेच उभा राहिलो. मला थांबलेले पाहताच तो जिन्यातूनच ओरडला
भाई, अंदर आ जाओ एरिया खराब है.
त्याचा आवाज ऐकून मी त्याच्या मागे मागे जिना चढू लागलो. जिना पुर्ण चढून जाताच समोरचे दृश्य पाहून माझ्या छातीत धस्स झाले. आतापर्यंत सज्जन वाटणारा आणि मला रस्ता दाखविणारा तरुण माझ्या समोर चाकू घेऊन उभा होता. मी आल्या पावली परत जाण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मागूनही एकजण चाकू घेऊन थांबलेला होता. दिल्लीतील ठकसेनांच्या टोळीने शिकार बनविल्याचे एव्हाना लक्षात आले होते.

गलत किया तुमने, मी जवळपास ओरडलो.
त्यावर त्याने एक जोरदार शिवी हासडली आणि दम देत म्हणाला, जितना माल है उतना बाहर निकालो. नहीं तो बॉडी का सारा माल बाहर निकाल देंगे.
एवढ्यात माझ्या मागून आलेल्या दुस-या तरुणाने मला मागून आपल्या विळख्यात पकडले. त्या तरुणाने माझे खिसे तपासून पैशाचे पाकीट काढून घेतले.
देखो, तुम्हे जो चाहिए था वह मिल गया है. अब मुझे जाने दो.
माझ्या समोर जगातले सगळे देव उभे राहिले होते. त्यातल्या प्रत्येकाची करुणा भाकत मी त्याला जाऊ देण्याची विनंती केली.
जाने देंगे. मगर एटीएम से पैसा निकालने के बाद.. त्याने हातातल्या पाकीटातून कार्ड बाहेर काढून त्याच्या पंटरकडे सोपविले.
नंबर बोल इसका नहीं तो यहीं घुसेड दूँगा साले. त्याने मला धमकाविले. नंबर सागण्याशिवाय दुसरा मार्गही नव्हता. मी त्याला पासवर्ड सांगितला. कार्ड घेउन तो पंटर बाहेर पडला.
बैठ जाव समोरच्या स्टुलावर बसण्याचा त्याने इशारा केला. मी मुकाट्याने आता पुढे काय वाढून ठेवलंय याची वाट पाहू लागलो. एवढ्यात एक निम्म्या वयाची बाई त्या तरुणाकडे आली.
इसको यहाँ क्यूँ लाया रे ? माझ्याकडे पाहत तिने त्या तरुणाला खडसावले.
नया है. घर मिलेगा नहीं वापस इसे. त्याने त्या बाईला समजावले.
क्या मिला इसके पास ? तिने विचारले
पर्समें दो हजार रुपये है. और एटीएम कार्ड से पैसे लाने भेजा है छोकरे को त्याने माहिती दिली.
दिखा पर्स इधर त्या बाईने माझे पाकीट जवळपास त्याच्याकडून हिसकावून घेतले आणि ती आत निघून गेली. एवढ्यात कार्ड घेऊन आलेला पोरगा आत आला. कितना मिला रे ? त्या तरुणाने विचारले. सात हजार रुपया त्या पोराने सांगितले. चिरकूट साला... कितना कम रखता है बे तु बैंक मे माझ्याकडे पाहत त्याने विचारले. तुमको जो चाहिए वह सब मिल गया. अब तो मुझे जाने दो. मी त्याला पुन्हा विनंती केली. सोनू इसको पहाडगंज वाली लॉज तक पहूँचा दे. त्याने पोराला हुकूम दिला. माझा जीव भांड्यात पडला. घाईघाईने मी पायऱ्या उतरु लागलो. जवळपास निम्मा जिना उतरलो असेल एवढ्यात पाठीमागून आवाज आला. सोनू, रुक उसको इधर लेके आव. हा आवाज मघाशी पाकीट घेऊन गेलेल्या बाईचा होता. अंगाला दरदरून घाम फुटला होता. जीव काकुळतीला आला पण त्या पोराने जवळपास मला खेचतच पुन्हा एकदा त्या बाईसमोर नेऊन उभा केले.

किधर से आया रे तू त्या बाईने मला प्रश्न केला
हैद्राबादसे आया हूँ मी उत्तर दिले.
हैद्राबादी दिखता है. मगर लगता नहीं. ती बाई म्हणाली
ठिक से बोल. कहाँ से आया है तु
महाराष्ट्र से हूँ मगर हैद्राबाद में नोकरी करता था
अच्छा कोणत्या गावचा हायेस त्या बाईच्या तोंडून मराठी शब्द ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला
सोलापूर जिल्ह्यातला आहे, बाई मला जाऊ द्या. मी इकडे फिरकणार पण नाही. मी काकुळतीला येऊन त्या बाईला विनंती केली.
करमाळ्याचा हाईस का तु ? तिने पुन्हा विचारले. माझ्या गावचं नाव तिच्या तोंडून ऐकून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.
होय. मी उत्तरलो. आश्चर्याचा हा धक्का ओसरतो ना ओसरतो तोच तिने पुन्हा एक मोठा बॉम्ब टाकला.
वांगीला अवघडे गुरजी हायेत ते कोण रं तुझं ? आता मात्र मी पक्का गारद झालो होतो.
माझे सख्खे चुलते. पण तुम्ही कसं काय ओळखता ? मी आवंढा गिळत विचारले
मला शिकीवलंय त्यांनी. ती बाई उत्तरली
मी पुन्हा हैराण.
ये हरामखोरा, पैसे इधर ला सारे. किस को लूट रहा था साले. तिने शिव्यांची लाखोली वाहत त्या तरुणाच्या हातातले सारे पैसे आणि एटीएम कार्ड तिच्याकडे घेतले. ते सगळे पैसे पाकीटात ठेऊन तिने पाकीट माझ्या हातात दिले. एखाद्या चित्रपटात शोभावा असा तो प्रसंग माझ्यासोबत घडत होता. अजूनही माझा माझ्या नशीबावर विश्वास बसत नव्हता. चाकूच्या टोकावर काही क्षणापुर्वीच मला लुटणारा तो तरुण आणि त्याचा पंटर हे दोघेही आता माझ्याकडे आपुलकीच्या नजरेने पाहू लागले.
वांगीचीच हाय मी. गुरजींनी लिवायला शिकिवलं. लई चांगलं होतं गुरजी. लई माया करायचे. कधीकधी खायला बी द्यायचे. पण चौथीची परीक्षा दिल्या दिल्या पुण्याला जावं लागलं आई-बापाकडं.... लगीन झाल्यावर नवऱ्यासोबत आले बघ हिकडं... पण त्या मुडद्याने मला इकून धंद्याला लावलं. ही पोटची पोरं नाहीत पण हिथं स्टेशनावर सापडलेली पोरं हायीत. संभाळत्यात मला असं काय बी धंदं करुन. मगाशी पाकीट बगताना तुझं गाव आणि नाव वाचलं. तवाच माज्या लक्षात आल्तं की तु गुरजीचा कोण तरी असशील. त्या बाईनं सगळं एका दमात सांगितलं. मी तिचं बोलणं ऐकतच राहिलो. दिल्लीनं आल्या आल्या दिलेला हा सर्वात मोठा दणका होता. मला काय करावं तेच कळत नव्हतं.
काय खाल्लंय का रं बाबा तु. चाय पेणार का ? तिनं विचारलं.
नको मी कसंबसं म्हणालो खरं पण पोटात कसंतरीच होत होतं.
अरं धंदेवाली असली तरी लई साफ-सफाई ठेवते मी. ती बोलली आणि सोनू कडे बघत दोन चाय ला रं अशी ऑर्डर सोडली. सोनू लगेच बाहेर पडला. रात्रीच्या जवळपास साडे-अकरा वाजल्या होत्या.
पहिलाच दिवस आहे माझा आजचा इथला. मी म्हणालो
संभाळून चाल रं बाबा. ही दुनिया लई बेका हाय तीनं काळजीच्या सुरात मला समजावलं
वांगीला लई मासं असत्यात. तिथली शाळा अजून बी तशीच हाय का तिनं विचारलं
मला नाही सांगता येणार पण गेल्या वर्षी तिथं बांधकाम सुरू होतं. मी तिला माहिती दिली.
आणि गुरजी . रिटायर झालं असत्याल आता.
होय, सहा वर्षापुर्वीच रिटायर झाले. मी तिला माहिती दिली.
त्यांची पोरगी ?
वारली. मी सांगितले
कशानं. ?
स्वयंपाक करताना भडका झाला स्टोव्हचा,
अरारा... आमी खेळायचो ल्हानपणी
तु हिकडं कशासाठी आलास
नोकरीसाठी आलोय. लॉजवर उतरलोय. जेवायला बाहेर पडलो होतो. तेवढ्यात.... मी म्हणालो
कशात कामाला लागलाय. तिने मला निम्म्यात तोडून विचारले.
मी टिव्हीत काम करतो. मी माहिती पुरवली
टिव्हीत ? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.
एवढ्यात सोनू प्लास्टीकच्या कपात चहा घेऊन आला.
घे चाय पे. माझ्याकडे एक कप सरकावित दुसऱ्या कप तिने स्वतःच्या हातात घेतला.
पोट भरलेले होते पण आता नको म्हणायचीही सोय नव्हती. मी बळेबळे चहा पिऊ लागलो.
रातच्याला असा फिरत जाऊ नको. लई बेकार एरीया हाय ह्यो. हिथला लॉज उद्याच्या उद्या सोड. माझी पोरं तुला चांगल्या एरियात लॉज करुन देतील. हिथली माह्यती होईपर्यंत तिथंच ऱ्हात जा. चहाचा रिकामा कप खाली ठेवत तिनं सोनू ला हाक मारली. सोनू लगेच तिथं दाखल झाला.
ह्ये बघ, मेरे गाव का बडा आदमी है ये. इसकू लॉजतक पहूँचा दे. और कल के कल अच्छा लॉज करके दे इसको. तिने सोनूला हुकूम सोडला.
नाही नाही. याची गरज नाही. माझ्या ऑफीसची माणसं करतील सोय मी तिला थांबवलं.
बरं... गुरजीला सांग, छायानं नमस्कार सांगितलाय म्हणून.आतापर्यंत करारी वाटणाऱ्या बाईच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाल्यासारखं वाटलं. दोन मिनिटे शांततेत गेली.
थोडा थांब. तिनं मला थांबविलं.
ती आत गेली. येताना तिच्या हातात छोटी पिशवी होती. तिने त्या पिशवीत हात घालून शंभराच्या नोटा बाहेर काढल्या. वांगीला गेलास तर माझ्या नावानं मलिकसायबाला एवढं पैसे देशील का ? तिनं मला विचारलं.
देईन की. न द्यायला काय झालं. ? मी शंभराच्या दोन नोटा तिच्याकडून घेत माझ्या खिशात ठेवल्या आणि निघालो. जिना उतरुन झाली येऊ लागलो. माझ्या पुढे सोनू आणि पाठीमागे छाया असा आमचा लवाजमा जिन्याच्या खाली उतरला.
पुना, येऊ नगंस हिकडं. तिनं मला सांगितलं.
दुसरा कुणी असता तर आतापर्यंत कुत्र्यासारखा मारला असता या पोरांनी. तिनं सांगितलं.
सोनू, अपने इलाके के लडकों बोल इस को कभी भी हात नहीं लगाने का. तिने फर्मावले
सोनूने काहीही न बोलता होकारार्थी मान हालविली.
तुमची पोरं?
हीच हायीत माझी पोरं. एक व्हतं पण नवरा घेऊन गेला पुण्याकडं. आता ते मला वळकत बी नसंल. सतरा वर्ष झाली. तवापासून रेल्वे स्टेशनावरची ही पोरं मी सांभाळली. स्वता धंदा करुन पैसा कमावला आणि ही आठ पोरं संभाळली. आता मी सगळं बंद केली ही पोरं मला संभाळत्यात. काय बी करत्यात पण कुण्या बाईला छेडत नाहीत ना कुण्या पोरीला कधी हात लावत. ती अभिमानानं सांगत होती.
पुण्याला किंवा वांगीला चला तिथं राहून काम करुन खा इथं राहण्यापेक्षा मी सुचवलं
नगं, कोणत्या तोंडानं जाऊ. सगळ्यांना माहीत हाय मी काय करत व्हते. त्यापेक्षा आपलं हीथंच बरं हाय
बरं तु जा आता. लई येळ झाला आता. पोरांच्या धंद्याचा टाईम हाय. असं म्हणत ती माघारी वळाली आणि जिना चढून समोरच्या घरात शिरली. पुन्हा मागे दोन-तीन वेळा वळून पाह्यलं. सोनूच्या पाठोपाठ चालत दहा मिनिटांच्या आत मी माझ्या रुमवर पोहोचलो.
दिल्लीचा हा पहिलाच अनुभव. गल्लीतून मघाशी माझ्यावर रोखलेल्या नजरा कोणाच्या हे आता माझ्या लक्षात आलं होतं. एखाद्या सिनेमाची बाराच्या बारा रिळे माझ्या समोरुन फिरून गेली होती. छायाची कहाणी राहून राहून माझ्यासमोर येत होती. आता कोणत्या तोंडानं परत जाऊ ? हा तिचा सवाल कानावर राहून राहून आदळत होता. छायाला भेटलो त्या दोन तासांत भय, आश्चर्य, करुणा असे असंख्य भाव माझ्या समोर फेर धरुन नाचत होते. आता मात्र मी या शहरात आणखी पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार करत छतावर फिरणा-या पंख्याकडे पाहत झोपेची वाट पाहू लागलो पण झोप केंव्हाच उडून गेली होती.

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२

गुस्सा ?

मै तो आज कुछ भी नहीं साब, कुछ साल पहले तो काफी लोग कुछ भी नहीं थे मगर आज सब कुछ है. अपना भी ऐसा होगा. माझ्याकडे न पाहता धापा टाकर तो बोलत होता. आत्मविश्नासाने खच्चून भरलेल्या त्याच्या शब्दांनी माझी उत्सुकता आणखीच चाळवली गेली. नाहीतरी मीच अगोदर त्याला डिवचलं होतं. कडाक्याच्या थंडीत दिल्ली शहरावर धुक्याची सफेद मलमल पसरते तेंव्हा मेट्रो स्टेशनपासून घरी जाण्यासाठी वाहनाचा आधार घेणे कधीही श्रेयस्कर ठरते. संध्याकाळी स्टेशनवर उतरलो तेंव्हा मी पण हाच निर्णय घेतला. डोक्याला कसलेतरी टापरे बांधलेला आणि अंगात दहा ठिकाणी जीवदान दिलेला स्वेटर घातलेला रिक्षावाला माझ्यासमोर येताच त्याला भाडंही न ठरविता मी त्यात बसलो. एवढ्यात समोरून एक अलिशान गाडी भरधाव वेगात आली आणि अचानक आम्हाला समोर पाहून आतल्या चलाख ड्रायव्हरने आम्हाला एक सफाईदार कट मारला. त्याचा हा जीवघेणा कट पाहून रिक्षावाल्याने त्याला दोन सणसणीत विशेषणे बहाल केली. साहब, ये बडे बाप की औलाद है. आराम का खाना, पिना और ऐसेही गाडी चलाना. सर्दी में इनका धंदा होता है. त्यावर मी म्हणालो, भाई, क्या कर सकता है तु. उनकी और अपनी हैसीयत देखकर चला कर. उसने तुम्हारी गालियाँ सुनी होगी तो और सरफिरा होगा तो अगली बार गाडी से तुम्हे उडा भी सकता है वह. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून माझी उत्सुकता चाळवली.


मी विचारले, नाम क्या है तुम्हारा
तो म्हणाला, जी दाऊद इब्राहिम
त्याचे नाव ऐकताच मी थोडं हसून म्हणालो. कहाँ से आए हो , सीधा दुबई से या कराची से
यावर तो देखील हसला आणि म्हणाला, साब, नाम दाऊद इब्राहिम है मग इज्जत की रोटी खाता हूँ इसिलिए किसीसे मुँह छिपाकर भागने की नौबत मुझपर अबतक नहीं आयी और ना आएगी.
सही है भाई, मी म्हणालो. कितने साल से रिक्शा चला रहे हौ ?
जी साहब, यह तो पिछले महिने से चला रहा हूँ. पहले मै गाडी चलाता था. अभी सेठने गाडी बेच दी तो काम नहीं है. दाऊद म्हणाला.
अरे, गाडी का लायसन्स होते हुए भी तु रिक्शा क्यूँ चलाता है, दुसरी गाडी पे चला जा, नहीं तो अपनी खुद की गाडी खरीद ले मी म्हणालो.
खुद की गाडी तो खरीद लेंगे साब, मगर अभी हम गाडी खरीद लेते है तो भाई की पढाई रुक जाएगी, तो म्हणाला
अच्छा ! क्या पढता है तुम्हारा भाई ? मी विचारले
जी डाक्टरी पढता है.यू पी में त्याने सांगितले
तो उसका सारा खर्चा तुमही उठाते हो. मी विचारले
त्यावर तो म्हणाला उसमे कौनसी बडी बात है साब
मेरे लायसन्स का पैसा भी उसीने होटल में काम करके कमाकर दिया था मुझे
कितने भाई-बहन हो तुम मी विचारले
जी, पाँच जने है हम तीन भाई और दो बहनें
तो क्या तुम सबसे बडे हो ?
हम ही है. मेरे के बाद वाली बहन है जिसकी शादी करा दी टीचर का कोर्स कराकर ऊसके बाद का भाई है जो डाक्टरी पढ रहा है बाकी सारे अभी पढ ही रहे है.
माता-पिता तो होंगे तुम्हारे, मी विचारले
नहीं, वह तो बंबई के दंगों मे मारे गए. मामू के यहाँ गए थे उसी रात मारे गए. हम तो बाबूजी छोटे-छोटे थे. आस-पडोस के लोगों ने पाला. पास के मंदिर से रोज खाना आता था हमारे लिए. अभी भी आता है. बडा साथ दिया लोगों ने साब
मी त्याची कहाणी ऐकतच होतो.

तुम्हारे मातापिता को हिंदूओं ने मारा, तुम्हे गुस्सा नहीं आता
गुस्सा ? त्याने प्रश्नार्थक विचारले. एवढ्यात माझ्या सोसायटीचे फाटक आले. मी उतरलो. नेहमीच्या अंदाजानुसार त्याला भाडे देण्यासाठी पाकीट बाहेर काढले. तेवढ्यात तो म्हणाला. साब, गुस्सा कर के क्या करुँगा. मरने-मारने वाले थोडे ही हिंदू-मुस्लीम थे वह तो एक हादसे का शिकार थे. अब हादसे पर गुस्सा कर के क्या होगा... अम्मी-अब्बा थोडेही वापस आनेवाले है. इस से अच्छा तो मै उनका शुक्रीया करुँ जिन्होंने हम यतीमों को बिना मजहब देखे इस काबील बनाया की आज हम सब लोग कुछ न कुछ कर के अपनी रोजी रोटी तो चला रहे है.
मगर यार तु रिक्शा कबतक चलाएगा.
चलाऊँगा, जबतक दुसरा काम नहीं मिलता.
त्याने माझ्याकडील पैसे घेतले आणि काही क्षणातच तो धुक्यात नाहीसा झाला.
मी त्या दिशेला पाहिलं, उद्या दुपारी जेंव्हा ऊन पडेल तेंव्हा हे धुके हटेलही पण लोकांच्या मनावरचं धुकं हटण्यासाठी काय करावं. असं स्वतःशीच पुटपुटत घराच्या पाय-या चढू लागलो.
समाप्त