रविवार, २७ मार्च, २०११

धुकं....

नोकरपेशा माणसाला पगाराच्या दिवसाचा किती मोठा आधार असतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सरकारी नोकरांचे पगार पहिल्या तारखेला होत असल्यामुळे त्यांना खुश है जमाना आज पहली तारीख है या गाण्याची मजा अनुभवणे सहज शक्य होते. परंतु खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना महिन्यातील कोणत्याही दिवशी हाच पगाराचा दिवस असे ठामपणे सांगता येत नाही त्यामुळे बऱ्याच अडचणी उभा राहतात. पत्रकार हा प्रकार यातच मोडत असल्यामुळे महिना जसा संपतो तसा त्याचा खिसा आणि घरातील वाणसामानांचे डबे एकाच गतीने संपत राहतात.


गेल्या महिन्यात सात तारखेला आलेला पगार या महिन्यात तब्बल 18 तारखेला आल्याने या महिन्यात किराणा जादा भरणे गरजेचे आहे असे ठरवून मी किराणा दुकानात गेलो. एक महिन्याचे लक्ष्य ठेउन डाळ, तांदूळ, तेल, साखर इ.इ. दीड महिन्यांच्या वाणसामानांचे भले मोठे ओझे झाल्यावर रिक्षा करणे गरजेचे होते. सुदैवाने ओळखीचा एक रिक्षावाला मंजूर सेखीया अचानक समोर येउन थांबला आणि म्हणाला, "बाबूजी घर चलना है ?"
मी होकारार्थी मान हलविताच त्याने स्वतःहून माझ्या हातातल्या दोन पिशव्या घेउन त्या रिक्षाच्या बाकाखालील रिकाम्या जागी ठेवल्या आणि मला म्हणाला, " बाबूजी आप बैठो. और कुछ रह तो नहीं गया."
मी म्हटले, "अरे नहीं, चलो हम घर की तरफ निकलते है."
मंजूर सेखीया हा माझ्या घरासमोरच्या सायकल रिक्षा स्टँडचा सदस्य... बरेचदा त्याच्या रिक्षातून येणेजाणे होत असल्यामुळे त्याची चांगलीच ओळख झाली होती. मी पत्रकार असल्याचे त्याला माहित होते. त्यामुळे बरेचदा तो माझ्याबरोबर राजकारण, समाजकारण अशा विषयांवर गप्पा मारायचा. मंजूर मला तेथे भेटल्यामुळे आता गप्पा मारत जाता येईल असे वाटल्याने मी देखील मनातून थोडा सुखावलो होतोच.
रिक्षा चालवत असतानाच मंजूर म्हणाला, "बाबूजी, जमाना बडा खराब हो गया आजकल.
मी म्हणालो, "मंजूरभाई, क्या हुवा अचानक ?"
त्यावर तो म्हणाला, "अब क्या बताए बाबूजी, आप के पडोस वाली सोसायटी में गर्ग साहब रहते है ना, वह मिले थे अस्पताल के बाहर, बडे परेशान लग रहे थे."
विशाल गर्ग म्हणजे या परिसरातील एक मोठी आसामी, बिल्डर्स लॉबीचा एक मोठा माणूस. अलीकडच्या काळात राजकारणातही छोटे-मोठे पाऊल टाकण्यास सुरू केलेला कोट्यधीश.
"क्यूँ क्या हुवा उन्हे, कोई बिमार होगा." मी म्हटले.
यावर मंजूर म्हणाला, "नहीं बाबूजी, बात दुसरी है. मैने वहीं खडे खडे सुन लिया. दोनों बाप बेटा बात कर रहे थे."
मी म्हटले, "जाने दो ना मंजूर कोई नीजी मामला होगा. हमे क्या करना है."
त्यावर मंजूर ने मागे वळून पाहिले आणि म्हणाला, "बाबूजी, पिछले साल जो शादी कराई थी ना, उस बेटी का बच्चा गिराने जाने वाले थे वह . मशीन में देख के आए की लडकी है, तो बस्स उन्होंने ले लिया फैसला."
मी म्हटले, "मंजूर, क्या करें, बडे लोगों के घरों में हम झाँक नहीं सकते. बुरी बात तो है यह."
यावर तो म्हणाला, "और गर्वमेंट इतना गला फाँड-फाँड कर बताएगी वह सिर्फ हम जैसे गरीबों के लिए. लडकी होगी तो फिर जाएगी इन्ही लोगों के घर. और फिर दहेज का पैसा कहाँ से लाएँगे." मंजूर पोटतिकडीने बोलत होता.


एवढ्यात रस्त्यात एक चहाचा गाडा दिसला. मी म्हटले, "यार मंजूर बहुत दिनों से चाय नहीं पी किसी रेहडीवाले की. चलो आज हसरत पुरी कर ही लेंगे." यावर तो हसला आणि त्याने रिक्षा त्याच्याजवळ उभा केला.
रेहडीवाल्याकडे चहासाठी गर्दी व्हायची ती रिक्षावाल्यांचीच. "रघू, दो कप बढीया चाय बना दे. "मंजूरने चहावाल्याला ऑर्डर दिली.
रघूने शेजारच्या डब्यातले पाणी चहाच्या मळकट पातेल्यात ओतले. पातेल्याच्या शेजारी कोणत्याही क्षणी मातीची पुटे गळून पडतील अशा डब्यातली दोन चमचे साखर त्यात टाकली. रेहडीच्या खालच्या बाजूला अडकविलेल्या किटलीतून दूधाचे एक माप त्याने किटलीत ओतले, शेगडीच्या शेजारी ठेवलेल्या चहाच्या गाळणीतली पुड पातेल्यात टाकून त्याने चहा उकळायला सुरूवात केली. हा सगळा सोहळा मी अनुभवत असतानाच मंजूरने कानाला अडकविलेली एक बीडी काढून एव्हाना शिलगाविली होती.
"लोगे ? " त्याने बीडी माझ्याकडे देत विचारले.
"नहीं पिता मै", मी त्यास नकार दिला.
एवढ्यात चहा उकळला होता. खालच्या बाजूच्या कप्प्यातून दोन प्लास्टीकचे कप काढून रघूने त्यात चहा भरला.
"लो बाबूजी गरमागरम चाय." रघू म्हणाला.
त्याच्या हातातून दोन्ही कप घेऊन त्यातला एक मंजूरकडे सरकाविला. त्यानेही तो मोठ्या अदबीने घेतला. थंडीच्या कडाक्यात घोटभर गरम चहाचाही मोठा आसरा झाला होता. रिक्षावाल्यांच्या शिवराळ गप्पा शेजारी सुरू होत्या. मंजूर आणि मी मोठ्या आरामात चहा पीत उभे होते. रघू मात्र रिक्षावाल्यांच्या घोळक्यात उभा राहून चहा पिणाऱ्या माझ्याकडे आश्चर्ययुक्त कुतुहलाने पाहत होता.
"बाबूजी, आप बडे लोगों की बात कर रहे थे ना. आप के सोसायटी का गार्ड, जो लंबा है पतलासा ,उसकी कहानी पता है आपको ? "मंजूरने मला विचारले.
मी म्हटले, "कौन अज्ञेश ?"
" जी वहीं " तो पुढे म्हणाला " जी उसने एक बेटी के बाद नसबंदी करवा ली. ना बेटे की चाहत ना कोई हसरत. गर्ग से हैसीयत में छोटा होगा शायद मगर आप ही बतावो दस कदम आगे है न् वह " मंजूरने पुरविलेली माहिती माझ्यासाठी अगदी नवी होती.
"सही बोल रहे तुम", मी म्हणालो.
चहाचा पेला रिकामा झाला होता. त्यामुळे मी म्हणालो, "अब हम चले ?" त्यावर मंजूर म्हणाला, "जी बाबूजी."
थोड्या वेळातच आम्ही पॉकेट सहाच्या गेटवर दाखल झालो. मंजूरचे पैसे चुकते करुन मी गेटकडे वळालो. ओझ्यासह आत आलेलो दिसताच अज्ञेश पुढे आला. मला न विचारताच त्याने माझ्याकडील दोन मोठ्या पिशव्या घेतल्या आणि सोबतच घराकडे निघाला. कडाक्याची थंडी असल्यामुळे आम्हा दोघांचीही चालण्याची गती कमीच झाली होती. घरासमोर येताच डोअरबेल वाजविली. मी आल्याचे लक्षात आल्याने माझा कृष्णा दरवाजासमोर येउन कल्ला करु लागला. बायकोने दरवाजा उघडताच तो अर्ध्या उघडलेल्या दरवाजातूनच बाहेर आला आणि माझ्यासोबत पिशवी आहे का ते पाहू लागला.
"तुम्ही आज पिशवी आणली नाहीत तातू.", त्याने आपल्या बोबड्या बोलात विचारले. "अरे बाळा, वॉचमन अंकल घेऊन आलेत आपल्या पिशव्या", मी त्याला समाजाविले. "असं काय", म्हणून तो आतल्या खोलीत पळाला आणि कार्टूनच्या विश्वात रमून गेला.
अज्ञेश पिशव्या ठेऊन परत वळू लागला तेवढ्यात मी विचारले, "भाई, सर्दी का कोई इलाज किया है भी या ऐसेही."
" जी हिटर लगाया है परधानजीने", त्याने उत्तर दिले.
"एक काम करो थोडी गरमागरम चाय ले जावो ",मी म्हणालो. माझे शब्द ऐकण्यापुर्वीच सौभाग्यवतींनी चहाचे आधण ठेवले होतेच.
"जी," असे म्हणून अज्ञेश दरवाजातच वाट पाहू लागला.
"अरे अंदर आवो," मी त्याला आत बोलाविले.
तो थोडा संकोचाने आत आला. मी विचारले, "बच्ची कौनसी कक्षा मे है अज्ञेश,"
"जी, तिसरी कक्षा में, पास के वेंकटेश्वरा इंटरनॅशनल स्कुल में पढती है." त्याने उत्तर दिले.
मी म्हटले, "अरे उसकी फिस तो काफी जादा है."
" जी है तो सहीं मगर बीबी भी कमाती है टेलरींग कर के. जब तक हो सके अंग्रेजी पढाएँगे. बडी अफसर बनाएँगे बिटीया को. अपनी तो एकही बेटी है जी. सबकुछ वहीं है." त्याच्या शब्दांत आशा आणि निग्रह एकाच वेळी दाटून आला होता.
मी म्हटले, "अज्ञेश, कुछ मेरे से बन पडे तो जरुर बताना."
त्यावर तो म्हणाला, "कुछ नहीं सर, बस्स मेंटेनस का चेक थोडा जल्दी भेजीए. तनखा तुरंत निकल जाती है."
" अऱे वह तो होगा ही." मी म्हणालो. एवढ्यात बायकोने थर्मासमध्ये तीन-चार कप चहा ओतून आणला होता. तो थर्मास घेऊन अज्ञेश निघून गेला. बाहेर धुकं दाटू लागलं होतं ते काही तासांत हटणार याची खात्री होतीच पण लिंगभेदाचं धुकं कधी हटणार याची गॅरंटी नसल्याने एकीकडे धुक्यात चाचपडणारा गर्ग आणि दुसरीकडे अज्ञानाच्या अंधारातून बाहेर निघालेला अज्ञेश अशी समाजाची दोन्ही रुपे माझ्या मनात फेर धरुन नाचत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: