सोमवार, २१ मार्च, २०११

साधूची रिक्षागिरी...

सु्ट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा खरेतर मनापासून कंटाळा येतो. आठवडाभर तेलाचा घाण्याला जुंपलेल्या बैलागत फिरत राहिल्यानंतरचा एक दिवस हक्काचा असतो. पण बायको नावाचा प्राणी आणि मुलगा नावाचा तिचा चमचा हे दोन पदार्थ घरात असल्यावर सुट्टीच्या दिवशी ताणून देण्याचा आनंद मिळूच शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ..... त्या दिवशीही बायको आणि पोराने असाच तगादा लावला म्हणून शेवटी सिनेमाला जावेच लागले.
द्वारकरा सेक्टर बाराहून मेट्रो पकडल्यावर राजौरी गार्डनच्या स्टेशनवर उतरलो. तेथून थिएटर थोडे लांब असल्यामुळे अॅटोला हात केला. आम्हा तिघांना पाहताच अॅटो थांबला
" कहाँ जाओगे ? "आतल्या ड्रायव्हरने विचारले.
"पुलीया के पार वाले थिएटर चलोगे?" मी विचारले.
"क्या दोगे ? त्याने मान जराशी बाहेर काढत विचारले.
मी म्हणालो, "मीटर से चलो भाई, जो होगा दे देंगे."
त्यावर तो म्हणाला," पचास रुपैया दो."
सौदा महाग होता. मी म्हणालो, "मीटरने चल जो पैसा होईल तो देईन." पण त्याला तो बधला नाही. माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत सुसाट वेगाने निघूनही गेला. तेवढ्यात पाठीमागून एक सायकल रिक्षावाला आलेला दिसला. रामायण-महाभारत सिरियलमधल्या एखाद्या साधूसारखी वाढलेली लांबच लांब दाढी, डोक्याला भगवे मुंडासे, अंगात भगवी कपडे आणि डोक्याला भासलेली इबिताचे त्रिपुंड असा त्याचा अवतार पाहून हा रिक्षावाला असूच शकत नाही अशी माझी खात्री झाली. पण तो जवळ आला आणि आम्हाला थांबलेले पाहून कुठे जाणार अशा अर्थाची खुण केल्यावर हा रिक्षावालाच असल्याचे समजले. "पुलीया के पार वाले थिएटर चलना है," मी म्हणालो.

"चलेंगे ना ?" तो म्हणाला.
रिक्षात चढता-चढता मी विचारले, "कितना ?"
त्यावर तो म्हणाला, "जितना मर्जी चाहे दो, या मत दो. चलोगे तो सही."
आम्ही अडीच माणसे ( मी, बायको आणि चार वर्षाचा मुलगा ) रिक्षात दाटीवाटीने बसलो. बायकोने हळूच विचारले, "अहो, हा माणूस चेटूक-बिटूक तर करत नाही ना आपल्यावर कसलीतरी जादू करेल हा." यावर आम्ही दोघेही हसलो.
"क्या हुवा बाबूजी?" रिक्षावाल्याने विचारले. मी त्याला आम्ही काय बोलत होतो ते सांगू लागलो. हे सांगत असताना बायकोने एक मोठा चिमटा मला काढला. त्याच्या वेदना चेहऱ्यावर उमटत असतानाच त्याच्या हास्याचा गडगडाट कानावर आला.
"अब क्या जादू-टोणा करुंगा साब. धंदा तो कब का डुब गया बस्स जिंदगी काटनी है. तो म्हणाला.
"तो क्या आप पहले करते थे ?" मी विचारले.
"अरे करते थे मतलब? समशान की खाक छानी है मंत्रविद्या के लिए. कोई भी भुत-पिशाच रहे हम यूँ भगाते है जी." त्याच्यातल्या मांत्रिकाने उचल खाल्ली होती.
मी विचारले," तो फिर यह रिक्षा क्यूँ चला रहे हो भाई ?"
"अरे बाबूजी जब गांव मे लोग ही नहीं रहे तो धंदा क्या खाक होगा ? लगता है साले भूत- पिरेत भी भाग गए लोगों के साथ." तो त्राग्याने म्हणाला.
"मतलब?" मी न समजल्यामुळे विचारले. इकडे बायकोच्या चेहऱ्यावर झाली यांची ड्युटी सुरू असे भाव येण्यास सुरू झाले होते.
ते वाचत मी रिक्षावाल्याचे उत्तर ऐकू लागलो." जी, कालाहांडी से हूँ. खाने नही मिला तो लोग गाँव छोड शहर की ओर भाग गए. बहुत सारे तो यहीं दिल्ली में आ गए. पिछले कुंभ के लिए हरिद्वार आया था. वापस जाते-जाते दिल्ली आ गए और यहीं रुक गए. अब तो बेटा धीरे धीरे शुरू करेंगे अपना काम. लेकीन तब तक पेट तो पालना है ना इसिलिए यह रिक्षा चला रहे है."
त्याचे उत्तर संपायला आणि थिएटर येण्यास एकच गाठ पडली. आम्ही खाली उतरलो आणि मी बायकोजवळ पैसे देऊन त्या दोघांना तिकीट काढण्यासाठी पिटाळले. रिक्षावाल्याला मी जास्त पैसे देणार याची पुर्ण खात्री असल्यामुळे बायको हळूच मी किती पैसे काढतोय हे पाहत तेथून निघाली. मी तीस रुपए काढून त्याच्या हातावर ठेवले आणि विचारले, "ठिक है."
"जी, बहुत है. एकसाथ तीस रुपए तो गाँव मे हप्ते की कमाई हो गयी बाबूजी." तो म्हणाला.
मी हसून थिएटरकडे वळलो. तेवढ्यात त्याने मला हाक मारून बोलावून घेतले आणि म्हणाला, "भगवान ना करे, मगर कोई भूत-पिरेत का चक्कर हो तो मुझे जरुर याद करना. कितना भी तगडा भूत हो साले को उसे यूँ डालेंगे बोतल में. इसी इलाके मे मिलूँगा."
मी म्हणालो, "अरे बाबा, पुरे देश को ही हरामी भुतों ने जकड लिया है और सबसे असली भूत तो संसद भवन मे जमा होते है सेशन के दौरान. उनका कोई बंदोबस्त कर सकते हो तो अगले महिने तुम्हे ले जाऊँगा. पुरा देश तुम्ही दुवा देगा और तु्म्हारी मोटी-तगडी कमाई भी होगी. "
त्यावर "क्या मजाक करते हो बाबूजी" म्हणत त्याने रिक्षा वळवला आणि पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या अधिवेशनात खासदार काय दिवे लावणार याचा विचार करीत मी थिएटरजवळ आलो.

निरूत्तर...

दहावीत 88 टक्के गुण मिळविल्यानंतर इंजिनियर होण्याच्या त्याच्या इच्छेने उचल खाल्ली नसती तर नवलच. पण आस्मानातून कहर कोसळला. बापाची तीन-चार एकर शेती कोसी नदीच्या उग्र रुपात स्वाहा झाली. हाय खाउन बापानं अंथरुण धरलं, आईने केंव्हाच जगाच निरोप घेतला होता. आठ वर्षाचा भाऊ, सहा वर्षांची बहीण आणि हाय खाऊन वेडापिसा झालेला बाप हे सगळं जेंव्हा असह्य झालं तेव्हा त्यानं सगळ्यांना घेऊन दिल्ली गाठली. दिल्लीच्या रस्त्यावरुन त्यानं सायकल रिक्षा चालवायला सुरुवात केली. गेली आठ वर्षे तो सायकल चालवितो आहे. स्वतःचं आणि कुटुंबाच पोट भरता भरता त्यानं बारावी केली. बारावीतही त्याचं नाणं खणकलं. केवळ पेनातली रिफिल संपली म्हणून त्याला वीस मार्कांचं लिहिता आलं नाही. अंगावरची कापडं पाहून कुणी पेन त्याच्याकडं भिरकविलाही नाही. पण तरीही ऐंशी टक्के


इंजिनिअर होण्याचं स्वप्न त्याच्या डोळ्यात दिसतं. सायकल रिक्षा चालविताना मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईतून तो छोट्या भावाचं आणि बहिणीचं शिक्षण, बापाच्या औषधपाण्याचा खर्च सर्व काही पाहतो. मधल्या काळात जेंव्हा दिल्लीत सायकल रिक्षांवर संक्रात आली तेंव्हा तो उपनगरांत आला. द्वारका या दिल्लीच्या उपनगरात तो सायकल चालवून उपजिविका करु लागला. रिक्षाच्या उजव्या बाजूला दहावीचं आणि डाव्या बाजूला बारावीचं मार्कलिस्ट प्लास्टीकच्या कागदात फ्रेम करुन त्यानं लावलं आहे. मला म्हणाला, साब आपही बतावो जहाँ महिने मे चार-पाच हजार कमाता था तब महँगाई नहीं थी दो हजार में घर चल जाता था. बाकी हम भाई-बहनों की पढाई और बाबा की दवादारु के लिए जाता. आजकल चार हजार भी पेट भरने के लिए काफी नहीं है. सबसे सस्ती सवारी लेकर चलता हूँ मगर फिर भी यह हालत है. इन मार्कलिस्ट का क्या करुँ.
मी काय बोलणार ? महिन्याचं बजेट बिघडू नये यासाठी रिक्षाच्या भावात घासाघीस करण्यासाठी उघडलेलं तोंड आपोआप मिटलं गेलं. त्याला मी काय सल्ला देउ ? नक्षलवादी हो म्हणू की तुझा हक्क हिरावून घेणाऱ्यांच्या (ज्यात माझाही समावेश होतो ) छातीवर पाय रोवून उभा रहा म्हणू......

नन्ही चिडियाँ...

त्याचं नाव लखन शास्त्री. एक दिवस रात्री उशीरा द्वारका सेक्टर 12 च्या मेट्रो स्टेशनहून घरी परतत असताना मला भेटला. थंडीचे दिवस होते त्यामुळे स्टेशनच्या बाहेर तीन-चार रिक्षावाले उभे होते. लखन त्यापैकीच एक. घरापर्यंत जाण्याचे पंधरा रुपये देतो म्हटल्यावर तो तयार झाला. पारा प्रचंड गोठलेला असतानाही डोक्याला केवळ एक मफलर, अंगात फाटशी पँट, स्वेटर आणि टिशर्ट यांचा मध्यबिंदू असणारा शर्ट त्याने घातला होता.
मी विचारले, थंड नही लगती.
त्यावर सायकल चालविता चालविताच तो मागे वळाला आणि म्हणाला
साब, पेट भरना हो तो भूख लगती ही नहीं. हम तो गालीब नहीं जिसे हुक्के का मलाल हो.
त्याचे हे वाक्य ऐकून मी कान टवकारले आणि त्याला म्हटले अरे भाईसाब, आपकी भाषा तो बडी साफ है. आप गालीब को कैसे जानते हो.
हे विचारताच तो हसला आणि म्हणाला, कुछ पढा है इसिलिए.
एका रिक्षावाल्याला वाचनाचा छंद असल्याचे पाहून माझे कुतूहल चाळवले. मी विचारले, क्या पढा है भाई आजतक ? त्यावर मात्र तो थबकला आणि थोड्या वेळाने म्हणाला, ' साब, जाने दिजीए यह तो गुजरा जमाना हो गया."
माझे घर जवळ येऊ लागले होते. मी पुन्हा विचारले, 'पढे-लिखे मालूम होते हो. कुछ लिखते भी हो क्या ?" त्यावर त्याने सायकलची गती मंद केली आणि माझ्याकडे वळून म्हणाला, "जी लिखता हूँ. बच्चों की कविताएँ लिखता हूँ. अबतक तीन सौ कविताएँ लिखी है."

मी म्हटले, 'अच्छा !' माझ्या आवाजात आश्चर्य आणि अविश्वास यांचा मिलाफ होता ज्यात अविश्वासाचा टक्का अधिक होता. मी विचारले, ' अभी है तुम्हारे पास ?'.
त्यावर सायकल चालवत चालवतच त्याने त्याची समोरच्या कॅरेजला अडकविलेली वही माझ्याकडे दिली. त्या मळकट झालेल्या वहीचे एक-एक पान उघडून मी कविता वाचू लागलो. कुठे नदीच्या पात्राची खळखळ, कुठे अल्लड सूर्यकिरणांचा चाळा, कुठे नन्ही चिडिया घरी बोलाविण्यासाठीची लाडीक विनवणी, बाळाला घास भरविण्यासाठी झाडाला लटके लटके रागावणारी आई, शांत झोपेत स्वप्नाच्या दुनियेचा राजकुमार झालेला बाळ.... एक ना दोन तब्बल तीनशे.....
पण मी वाचल्या फक्त दहा-पंधरा कविता कारण तेवढ्यात माझे घर आले. त्याचे पैसे चुकते करण्यापुर्वी विचारले, ' इतनी अच्छी कविताएँ कही छपवायी नहीं.'
त्यावर तो म्हणाला साब,' कहाँ छपवाऊँ. अखबारों मे कुछ एक प्रकाशित हो चुकी है बस्स.'
विषय बदलून मी विचारले, 'शादीशुदा हो क्या ? कुछ बच्चे है तुम्हारे ?'
त्यावर त्याच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी तरळले म्हणाला, 'साब आपने इसमें नन्ही चिडियाँ कविता पढी है न्... मेरी नन्ही चिडियाँ कब की उड गयी साब.... उत्तर प्रदेश के बुंदेलखंड से हूँ..... अकाल से पेट और जेब खाली हो गयी. जब गुडीयाँ बिमार पडी तो एक हजार रूपये एकड से पाच एकड जमीन बेच डाली. सारा पैसा इलाज में खर्च किया. मगर फिर भी मेरी गुडीयाँ नहीँ बची. मेरे हाथों मे दम तोड दिया.... उसे नन्ही चिडीयाँ यह कविता बहुत अच्छी लगती थी. अब किसे सुनाऊँ यह कविता......?"
त्याच्या आणि माझ्या डोळ्यांतही अश्रूंची गर्दी झाली. मी त्याचे पैसे चुकते केले आणि गेटवरून आतपर्यंत येउ लागलो तोच डोक्यात विचार आला की, त्याच्या कविता तर आपण छापू शकलो तर.....
मी गेटपर्यंत परत आलो पण तोपर्यंत तो धुक्यात हरवून गेला होता. घराच्या आत येताच समोर माझं पिल्लू उभं होतं. बापाने त्याच्यासाठी काय आणलंय या जिज्ञासेपोटी त्याने मी घरात पाय टाकायच्या आतच माझी पिशवी जवळपास हिसकावून घेतलीही होती. बाजूला माझ्या पिल्लाची कलकल सुरु असतानाच लखन शास्त्रीची नन्ही चिडियाँ माझ्या मनात चिवचिवत होती........

पाठकजींचा पाठ

महाराष्ट्रात अशोक चव्हाण पायऊतार झाल्याचा आदर्श प्रस्थापित झाल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीचे झेंगाट दिल्लीतील पत्रकारांच्या माथी लागले. काँग्रेसच्या 26 अकबर मार्ग येथील कार्यालयात सुरु असणाऱ्या गुप्त बैठका, चर्चा इ. इ. चे वार्तांकन करता करता घरी पोहोचण्यासाठी रोजच रात्र होत होती. एकदा तर चक्क शेवटची रात्री साडे-अकराची मेट्रो पकडून घराकडे निघालो. सुदैवाने जागाही लगेचच मिळाली. जागा मिळताच मेट्रोच्या एकसुरात सुरु असलेल्या सुरावटीमुळे दिवसभराच्या श्रमाने चटकन झोपही लागली. या झोपेनेच दगा झाला आणि मी चक्क द्वारका सेक्टर 12 च्या स्टेशनवर उतरण्याऐवजी दोन स्टेशन पुढे आलो. परतीची ट्रेनही नाही आणि रस्त्यावर दुसरे कोणतेच वाहन उपलब्ध नाही अशा वेळी काय करावे या विचारातच मी आश्विनीला ( माझी पत्नी ) फोन लावला आणि घडलेला प्रकार सांगितला आणि माझ्या टेन्शनमध्ये तिलाही भागीदार करुन घेतले.
एवढा बाका प्रसंग पुढे ठाकला असताना दूरवर अंधारात एक रिक्षा उभा असलेला दिसला. मेट्रो स्टेशनच्या फ्लडलाईटसपासून अंमळ दूरच असलेल्या या रिक्षाचा एक चान्स घेण्यास काय हरकत आहे असा विचार मनाला स्पर्शून गेला आणि पावले आपसूकच तिकडे वळली. पाच ते दहा मिनिटांच्या आतच मी रिक्षाच्या जवळ पोहोचलो. त्यात एक प्रौढ वयाचा रिक्षावाला आपल्या अनंत श्रमाचा परिहार करीत शांतपणे पहुडला होता. दिवसभराच्या श्रमाने थकलेल्या माणसाला दोन घास पोटात जाताच कुठेही झोप लागते म्हणतात ना की, भुकेला कोंडा आणि नीजेला धोंडा.
''अरे भाई, चलोगे पॉकेट सिक्स जाना है... '' मी त्याला उठवित विचारले.
माझ्याकडे पाहत आळोखे-पिळोखे देत तो म्हणाला, " बाबूजी बडा लेट कर दिया आपने. अब तो चलना मुश्कील है मग फिर भी क्या दोगे " उशीरा आल्याची किंमत तर चुकवावी लागणार होतीच. नेहमीच्या स्टॉपपासून तब्बल साडेचार किलोमीटर निर्जन स्थानी पोहोचलो होतो त्यामुळे म्हणेल ती किंमत देण्याची तयारी होतीच.
मी म्हटले, ''तीस रुपया दूँगा."
त्यावर तो म्हणाला, "नहीं बाबूजी, बहुत कम दे रहे हो. पाच रुपैय्या और बढा लो." साठ रुपए अॅटोला देण्यापेक्षा पस्तीस रुपये रिक्षावाल्या देणे हा स्वस्तातील सौदा होता. त्यामुळे मी त्यास तत्काळ होकार दिला. बोचऱ्या थंडीत कुडकुडत मी मागे बसलो आणि रिक्षावाला पुढे रिक्षा चालवत होता.
पाचेक मिनिटांनी मी कुडकुडतच रिक्षावाल्याला विचारले, "भाईसाब आपका नाम क्या है. त्यावर तो म्हणाला जी ! शंकर पाठक नाम है जी मेरा."
" पंडत हो क्या ?" मी विचारले
त्यावर तो म्हणाला, "हाँ जी, पंडत है मगर आज कल कौऊन पंडत और कौऊन छोट जात सब एकही है. पर आपने कैसे पहचाना ?"
त्यावर मी म्हटले, "इतनी लंबी चोटी रखी है तो पहचान मे तो तुरंत आवोगेही."
त्यावर तो हसला. थोडा वेळ थांबून म्हणाला, "बाबूजी घर पहुँचने के लिए इतनी देर लगाना ठिक नहीं. आजकल जमाना बडा खराब है. थोडा जल्दी पहुँचा करो घर... "
मी म्हणालो, "क्या करे पाठकजी, झपकी आ गयी थी इसिलिए इतना बडा कांड हो गया."
थोडा वेळ शांततेत गेल्यावर अचानक समोरुन एक कार सुसाट वेगाने आली आणि रिक्षाच्या अगदी जवळून गेली. पाठक ने रिक्षा थांबविला. अचानक ब्रेक दाबल्यामुळे मी देखील थोडा पुढे आलो. गाडी दूरवर जात असल्याचे पाहून एक सणसणीत शिवी हासडत पाठक म्हणाला, "बाबूजी, बडी बाप की औलाद यह है. ना खुद की फिकीर ना दुसरों की चिंता. अगर आज कुछ हो जाता तो यह कमीना रुकता भी नहीं."
मी पण थोडा सर्द झालो होतोच, पाठकच्या समयसूचकतेचे कौतुक करुन मी म्हणालो, "पाठकजी यह तो बडा कांड हो जाता आज. "
त्यावर तो म्हणाला," जी क्या बताएँ, पिछले साल आशीर्वाद चौक के पास की गली में एक गाडी हमें ठोकर मारी. सवारी और हम दोनों जख्मी हो गए. खैर सवारी ने अपना इंतजाम किया मगर हम दुई घंटे तक वहीं पडे रहे आखिर एक रिक्षेवाले ने अस्पताल पहुँचाया. चार महिना अस्पताल में रहना पडा. पाच हजार रुपैय्या खर्चा आया और हाथ के पंजे के साथ पैर की चार उँगलीयाँ टुटी सो अलग."
मी चकीतच झालो आणि म्हणालो, "अरे फिर रिक्षा कैसे चलाते हो. त्यावर आपला बिनापंज्याचा हात माझ्याकडे दाखवत तो म्हणाला, बाबूजी हाथ का पंजाही तुटा है मगर पुरा हाथ तो सलामत है. जुगाड हो जाता है."
मी म्हणालो, पाठकजी, "आपको तो सलाम करना पडेगा. मगर इतना सब कुछ होने के बावजूद अपने गांव में ही कुछ करते तो बेहतर होता और क्या आप को हर्जाना नहीं मिला ?"
त्यावर तो म्हणाला, "हर्जाने की बात छोडीए साहब. पुलीस वालों ने हमको ही उल्टे हाथ ले लिया. एक हजार रुपैय्या दिया और बोला की मुँह बंद रखो वर्ना बिना लायसन्स का केस कर देंगे. मरता और क्या करता. चुप बैठ गया. लेकीन साब बेटी ब्याहनी है ना इस साल. दसवी पास कर रखा है उसने सिलाई-कढाई भी जानती है. अच्छे घर में जाएगी तो राज करेगी इसिलिए कर रहे है, ओढ रहें है. "
मी विचारले, "पाठकजी, कोई लडका-वडका नहीं ?"
त्यावर तो म्हणाला, "पकड के नसबंदी करवाई दिए थे कांग्रेसवाले हमारी. एकही औलाद है उसी को पढाए-लिखाए. मगर अब आगे नहीं पढा पा रहे इसिलिए शादी की सोच रहे है."
मी म्हटले वह तो संजय गांधी के जमाने में हुवा होगा ना, तो आपकी बेटी तो काफी बडी होगी. त्यावर तो शांत राहिला आणि थोड्या वेळाने म्हणाला, "बाबूजी शादी नहीं हुई थी हमारी जब नसबंदी करवाए थे. यह तो हमारी बीबी की बेटी है. गाँव के दोस्त के बेटी से शादी किए है, विधवा हो गयी थी एक बच्ची को जनने के बाद. बाप बेटी को देख भी नहीं पाया. नसीब के खेल है साब. अभी बस्स उसकी शादी करवानी है."
पाठकजीची कहाणी ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. मी म्हणालो, "पाठकजी आप महान है. आप के चरण छुने का मन कर रहा है."
त्यावर फक्त तो हसला. तेवढ्यात पॉकेट सिक्सच्या गेटवर रिक्षा येऊन पोहोचली. मी त्याला पन्नासची नोट दिली. त्याने पंधरा रुपये परत केले. मी म्हणालो, "पाठकजी, यह रुपए रखीए. बेटी के काम आएंगे." तो म्हणाला, "नहीं बाबूजी, जितना तय हुवा है उतना ही लेंगे."
मी शांतपणे पैसे घेतले आणि म्हणालो, "पाठकजी आप महान हो. त्यावर तो हसला आणि म्हणाला, साब मै महान नहीं बस्स एक मजबूर बाप हूँ. काश मेरी बेटी की शादी अच्छे घर में हो. अबतक कुछ रुपए जमा किए है. कुछ और करुँगा. चार महिने में हो जाएगा सब."
मी म्हटले उसके बाद क्या करोगे ? त्यावर तो शांत राहिला आणि म्हणाला, "पता नहीं...."
दूरवर जात असलेल्या पाठकजीच्या रिक्षाकडे तो अंधारात अदृश्य होईपर्यंत मी पाहत होतो. मला माझ्या पत्त्यावर आणून सोडणाऱ्या पाठकजींना पडणारा प्रश्न अर्थात मलाही सतावत होताच. कल क्या होगा. आणि उत्तर होते 'पता नहीं....."