सोमवार, २१ मार्च, २०११

साधूची रिक्षागिरी...

सु्ट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा खरेतर मनापासून कंटाळा येतो. आठवडाभर तेलाचा घाण्याला जुंपलेल्या बैलागत फिरत राहिल्यानंतरचा एक दिवस हक्काचा असतो. पण बायको नावाचा प्राणी आणि मुलगा नावाचा तिचा चमचा हे दोन पदार्थ घरात असल्यावर सुट्टीच्या दिवशी ताणून देण्याचा आनंद मिळूच शकत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ..... त्या दिवशीही बायको आणि पोराने असाच तगादा लावला म्हणून शेवटी सिनेमाला जावेच लागले.
द्वारकरा सेक्टर बाराहून मेट्रो पकडल्यावर राजौरी गार्डनच्या स्टेशनवर उतरलो. तेथून थिएटर थोडे लांब असल्यामुळे अॅटोला हात केला. आम्हा तिघांना पाहताच अॅटो थांबला
" कहाँ जाओगे ? "आतल्या ड्रायव्हरने विचारले.
"पुलीया के पार वाले थिएटर चलोगे?" मी विचारले.
"क्या दोगे ? त्याने मान जराशी बाहेर काढत विचारले.
मी म्हणालो, "मीटर से चलो भाई, जो होगा दे देंगे."
त्यावर तो म्हणाला," पचास रुपैया दो."
सौदा महाग होता. मी म्हणालो, "मीटरने चल जो पैसा होईल तो देईन." पण त्याला तो बधला नाही. माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत सुसाट वेगाने निघूनही गेला. तेवढ्यात पाठीमागून एक सायकल रिक्षावाला आलेला दिसला. रामायण-महाभारत सिरियलमधल्या एखाद्या साधूसारखी वाढलेली लांबच लांब दाढी, डोक्याला भगवे मुंडासे, अंगात भगवी कपडे आणि डोक्याला भासलेली इबिताचे त्रिपुंड असा त्याचा अवतार पाहून हा रिक्षावाला असूच शकत नाही अशी माझी खात्री झाली. पण तो जवळ आला आणि आम्हाला थांबलेले पाहून कुठे जाणार अशा अर्थाची खुण केल्यावर हा रिक्षावालाच असल्याचे समजले. "पुलीया के पार वाले थिएटर चलना है," मी म्हणालो.

"चलेंगे ना ?" तो म्हणाला.
रिक्षात चढता-चढता मी विचारले, "कितना ?"
त्यावर तो म्हणाला, "जितना मर्जी चाहे दो, या मत दो. चलोगे तो सही."
आम्ही अडीच माणसे ( मी, बायको आणि चार वर्षाचा मुलगा ) रिक्षात दाटीवाटीने बसलो. बायकोने हळूच विचारले, "अहो, हा माणूस चेटूक-बिटूक तर करत नाही ना आपल्यावर कसलीतरी जादू करेल हा." यावर आम्ही दोघेही हसलो.
"क्या हुवा बाबूजी?" रिक्षावाल्याने विचारले. मी त्याला आम्ही काय बोलत होतो ते सांगू लागलो. हे सांगत असताना बायकोने एक मोठा चिमटा मला काढला. त्याच्या वेदना चेहऱ्यावर उमटत असतानाच त्याच्या हास्याचा गडगडाट कानावर आला.
"अब क्या जादू-टोणा करुंगा साब. धंदा तो कब का डुब गया बस्स जिंदगी काटनी है. तो म्हणाला.
"तो क्या आप पहले करते थे ?" मी विचारले.
"अरे करते थे मतलब? समशान की खाक छानी है मंत्रविद्या के लिए. कोई भी भुत-पिशाच रहे हम यूँ भगाते है जी." त्याच्यातल्या मांत्रिकाने उचल खाल्ली होती.
मी विचारले," तो फिर यह रिक्षा क्यूँ चला रहे हो भाई ?"
"अरे बाबूजी जब गांव मे लोग ही नहीं रहे तो धंदा क्या खाक होगा ? लगता है साले भूत- पिरेत भी भाग गए लोगों के साथ." तो त्राग्याने म्हणाला.
"मतलब?" मी न समजल्यामुळे विचारले. इकडे बायकोच्या चेहऱ्यावर झाली यांची ड्युटी सुरू असे भाव येण्यास सुरू झाले होते.
ते वाचत मी रिक्षावाल्याचे उत्तर ऐकू लागलो." जी, कालाहांडी से हूँ. खाने नही मिला तो लोग गाँव छोड शहर की ओर भाग गए. बहुत सारे तो यहीं दिल्ली में आ गए. पिछले कुंभ के लिए हरिद्वार आया था. वापस जाते-जाते दिल्ली आ गए और यहीं रुक गए. अब तो बेटा धीरे धीरे शुरू करेंगे अपना काम. लेकीन तब तक पेट तो पालना है ना इसिलिए यह रिक्षा चला रहे है."
त्याचे उत्तर संपायला आणि थिएटर येण्यास एकच गाठ पडली. आम्ही खाली उतरलो आणि मी बायकोजवळ पैसे देऊन त्या दोघांना तिकीट काढण्यासाठी पिटाळले. रिक्षावाल्याला मी जास्त पैसे देणार याची पुर्ण खात्री असल्यामुळे बायको हळूच मी किती पैसे काढतोय हे पाहत तेथून निघाली. मी तीस रुपए काढून त्याच्या हातावर ठेवले आणि विचारले, "ठिक है."
"जी, बहुत है. एकसाथ तीस रुपए तो गाँव मे हप्ते की कमाई हो गयी बाबूजी." तो म्हणाला.
मी हसून थिएटरकडे वळलो. तेवढ्यात त्याने मला हाक मारून बोलावून घेतले आणि म्हणाला, "भगवान ना करे, मगर कोई भूत-पिरेत का चक्कर हो तो मुझे जरुर याद करना. कितना भी तगडा भूत हो साले को उसे यूँ डालेंगे बोतल में. इसी इलाके मे मिलूँगा."
मी म्हणालो, "अरे बाबा, पुरे देश को ही हरामी भुतों ने जकड लिया है और सबसे असली भूत तो संसद भवन मे जमा होते है सेशन के दौरान. उनका कोई बंदोबस्त कर सकते हो तो अगले महिने तुम्हे ले जाऊँगा. पुरा देश तुम्ही दुवा देगा और तु्म्हारी मोटी-तगडी कमाई भी होगी. "
त्यावर "क्या मजाक करते हो बाबूजी" म्हणत त्याने रिक्षा वळवला आणि पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या अधिवेशनात खासदार काय दिवे लावणार याचा विचार करीत मी थिएटरजवळ आलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: