बुधवार, ६ मार्च, २०१३

प्रेम..


भारतीय रेल्वेचं जगच वेगळं... रेल्वेच्या फलाटांवर एक वेगळीच दुनिया वसते. या दुनियेचं वर्तुळ 'अप' आणि 'डाऊन' या दोन शब्दांभोवती फिरतं. अप-डाऊनच्या जगात माणसांच्या नावांना नाही पण गाड्यांच्या नंबरांना मोठी किंमत, त्यामुळे माणसांच्या वस्तीशेजारीच वसलेली ही यांत्रिक वस्ती तशी वेगळीच म्हणावी लागेल. भारतात राहणाऱ्या बहुतेक सर्वच माणसांचा आयुष्यातून एकदा का होईना पण रेल्वेच्या जंजाळाशी संबंध आलेला असतो. ही दुनिया रोजच अनुभविणाऱ्यांना तिचं वेगळेपण अंगवळणी पडलेलं असलं तरी बरेचदा या दुनियेत नव्याने दाखल होणाऱ्यांना थोडं अवघडल्यासारखं होतं हे निश्चित...
दिल्लीतल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनावर दाखल होताना याच अवघडलेपणाचा अनुभव मला नेहमी येतो. लांब विसावलेले रेल्वेचे रुळ जणू अनंत कालासाठी पहुडलेले तक्षक आणि वासुकीच....  वळणेवळणे घेत लांबच लांब.... मनात आजही धडकी भरवितात. त्यामुळेच की काय आजही रेल्वेचे रुळ ओलांडताना मनावर ही भीतीचा बोजा जाणवतो. गावाकडून येताना बरेचदा दिल्लीच्या बाहेर गाडी थांबतेच थांबते. अठरा-एकोणीस तासांचा दमविणारा प्रवास करुन आल्यावर हे अंतर बरेचदा नकोसे वाटते. पण पलवल किंवा फरीदाबादला उतरून रेल्वेचे रुळ ओलांडून पलीकडच्या रस्त्यावरुन दिल्ली परीवहन सेवेची बस पकडून घरी जाण्याची हिम्मत आतापर्यंत मी केली नव्हती. पण याखेपेस हि 'रीस्क' घेण्याचे मी ठरविले.
अहमदनगरच्या स्टेशनवर तब्बल सात तासांची जीवघेणी प्रतीक्षा आणि त्यानंतर दहा तासांच्या प्रवासाला लागलेला तब्बल सोळा तासांचा अवधी यामुळे कंटाळून अखेर फरीदाबादला उतरण्याचं पक्कं ठरवलं. दिल्लीत दरवर्षी धुक्यामुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडतं. त्यामुळे स्टेशनच्या जवळपास असूनही सुरक्षित पोहोचण्यासाठी प्रवाशांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. याखेपेसही असंच धुकं होतं. त्यामुळे एरवी वीजेच्या चपळाईने धावणाऱ्या गाड्या गोगलगाईलाही लाजवेल एवढ्या गतीने पुढे सरकत होत्या.
फरीदाबाद जसं जवळ येऊ लागलं तशी माझी चुळबुळ वाढली. सामान एका जागेवर जमा केल्यानंतर स्टेशन येण्याची वाट पाहू लागलो पण पुन्हा एकदा गाडी थांबली. फरीदाबादपासून साधारणतः दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गाडी थांबल्यामुळे चरफडत थांबलो. गाडीतल्या प्रवाशांच्या तोंडावरही एक अजब प्रकारची चीड होती. प्रवाशांच्या निरर्थक चर्चांमध्ये सरकार, सिस्टीम, रेल्वे प्रशासन, पंतप्रधान, राष्ट्रपती, कुठला तरी अभिनेता असे उल्लेख येत होते. या उल्लेखांचे एक अनोखे मिश्रण कानावर पडून पडून आता त्याचाही कंटाळा येऊ लागला होता. मी डब्यात एकवार नजर फिरविली. माझ्या शेजारच्या बाकड्यावर बसलेल्या एका वयस्कर जोडप्याकडे माझे लक्ष गेले.
श्रीरामपूर स्टेशनावरुन ही जोडी दिल्लीसाठी बसली होती. शिर्डी साईबाबाच्या मंदिरात मत्था टेकण्यासाठी आलेली ही पंजाबी जोडी आपापसातच काहीतरी हळू हळू आवाजात बोलत आणि पुन्हा आपल्या हातातल्या माळांचे मणी ओढत नामस्मरणात गुंतवून टाकत. पण आता या जोडीनेही आपल्या माळा पिशवीत ठेवल्या होत्या. बहुतेक त्यांनाही फरीदाबादलाच उतरायचे होते. जवळपास वीस मिनिटांनी गाडी निघाली. याखेपेस मात्र ती थेट फरिदाबाद स्टेशनलाच थांबली. अजिबात वेळ न दवडता मी फ्लॅटफॉर्मवर उतरलो. गाडीच्या डब्यातील त्या विचित्र आणि कोंदट विश्वातून अखेर अशा रितीने माझी सुटका झाली होती. फरिदाबादच्या स्टेशनवर उतरलो तेंव्हा बऱ्यापैकी अंधार होऊ लागलेला होता. माझ्या पाठोपाठच उतरलेली ती जोडी वगळता इतर कोणताही प्रवाशी स्टेशनवर उतरला नव्हता. पाच मिनिटांनंतर गाडी धाड् धाड् करीत स्टेशनावरुन निघून गेली. इथून-तिथून रिकाम्या फलाटावरुन नजर फिरवित मी स्टेशनच्या बाहेर निघालो. थोडे अंतर चालून गेलो असेल एवढ्यात पाठीमागून ती जोडी येत असल्याची चाहूल लागल्याने मी मागे वळून पाहिले. एक मोठी पिशवी त्या दोघांनी एक एक बंद पकडून वाहून चालविली होती. वार्धक्यामुळे सुरकुतलेली थरथर त्या दोघांच्या हाताला दूरवरुनही जाणवित होती. त्यांची ती अवस्था पाहून मी मागे वळालो आणि अंकल, क्या मै आप का बैग ले सकता हूँ ? असा प्रश्न केला. काहीशा साशंक नजरेने माझ्याकडे पाहणाऱ्या त्या म्हाताऱ्याला प्रतिप्रश्न विचारण्याची संधीही न देता ती पिशवी मी माझ्या हातात घेतली आणि त्यांच्यासोबत चालू लागलो.
"बेटा, कहाँ तक जा रहा हो." म्हाताऱ्याने विचारले
"जी, मै तो व्दारका तक जाऊँगा. आप ?" मी विचारले
"जनकपुरी तक जाना है." म्हातारा माझ्या प्रश्नाला एकदम कट-टू-कट उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होता. पण संभाषण चालू ठेवण्याच्या निमित्ताने मी विचारलेच "अंकल, रुट तो पता है ना ? या फिर मै छोड......"
"बेटा आएगा ना लेने के लिए." माझा प्रश्न पुर्ण होण्याच्या आतच म्हातारीने उत्तर दिले.
"चुप करो. हाथ-पैर सलामत है ना अभी. जाएंगे हम." म्हातारा जवळपास म्हातारीवर ओरडलाच. यावर म्हातारीने खाली मान घातली आणि ती दोघेही एकमेकांचा हात धरुन एकमेकांना सांभाळत माझ्या मागून चालू लागली. एव्हाना आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो होतो. बाहेर आल्यावर धक्काच बसला. एरव्ही गजबजलेलं हे स्टेशन आज मात्र एकदम शांत-शांत होतं. बाहेर एकही रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला दिसत नव्हता. कदाचित थंडीच्या लाटेचा परिणाम असावा. मी समोरुन आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला विचारले, 
"भाई, इतना सुनसान क्यूँ है स्टेशन ? " यावर त्याने दिलेली माहिती ऐकून या स्टेशनवर उतरण्याचा आमचा निर्णय चुकल्याची जाणीव झाली. स्टेशनच्या भागात दोन गटांत दंगल उसळल्यामुळे पोलीसांनी सगळा परीसर रिकामा केला होता. स्टेशनवर बराच वेळ थांबल्यानंतर पोलीसही शेकोटीचा आसरा घेण्यासाठी निघून गेले होते.
अब तो और मुश्कील में फस गए, म्हातारा माझ्याकडे पाहत हताशपणे म्हणाला.
मै क्या कहती हूँ, अब तो फोन करो महेश को, म्हातारीने सुचविण्याचा प्रयत्न केला
महेश को फोन तो करुंगा लेकीन..... म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहत पुढचे शब्द गिळून टाकले.
आप करो तो सही. तिने पुन्हा एकदा आग्रह केला. अखेर त्याने आपला फोन खिशातून बाहेर काढला आणि कानाला लावून पलिकडच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करु लागला. मी पण माझ्या खिशात हात घालून माझा मोबाईल बाहेर काढला. पण बिचाऱ्याने मान टाकलेली होती. मोबाईलची पुर्ण बॅटरी उतरून गेली होती आणि चार्जरही बॅगेत नसल्यामुळे घरी जाईपर्यंत मी जगापासून अक्षरशः तुटला गेलो होते. इकडे अंकल फोनवर बोलू लागले.
"हैल्लो, हां.... ब..ब. बेटा महेश, हां... हम यहाँ उतरे है... फरिदाबाद... क्या... बडी थंड है यहाँ... कर्फ्यू लगा है.. क्या करे... अच्छा...ठिक है जैसा तुम ठिक समझो. अच्छा रखता हूँ...."
त्याचं हे अर्धे तुटक संभाषण मी ऐकत होतो. फोन बंद करताच तो म्हातारीवर जवळपास ओरडलाच.
"बोला था मैने. बडा आदमी बन गया है तुम्हारा बेटा. माँ बाप से भी बडा. कह रहा है काम बहुत है.... आज की रात उतरो वहीं... कर्फ्यू हटने पर आ जाना...."
त्याच्या चेहऱ्यावर अनंत काळाच्या पराभवाचे भाव अचानक दाटून आले.
समोरचा एक बाकडा पाहून त्या दोघांनाही मी तेथे बसविले. खाली बसताच म्हातारीने डोळ्यांना पदर लावला. माझ्याकडील बॅग घेऊन म्हाताऱ्याने त्यातील एक शाल काढली आणि तिच्या अंगावर टाकली. त्यानंतर पुन्हा एकदा बॅगमध्ये हात घालून लाल रंगाची माकडटोपी काढली आणि स्वतःच्या डोक्यावर चढविली. थोडा वेळ शांततेत गेला. अखेर म्हाताऱ्यानेच शांतता भंग केली. 
"बस्स करो ! और कितना रोएगी. सुबह तो जाएंगे घर. औऱ मै हूँ ना साथ में......" एखाद्या लहान लेकराला समजवावे तसा तो तिला समजावित होता.
"कुछ खाएंगे अंकल ?" विषय बदलावा म्हणून मी विचारले.
"नहीं बेटा."
"लिजिए ना." मी माझ्या बॅगमधली बिस्कीटे त्यांच्यापुढे केली. त्यातली दोन बिस्किटे काढून बाकीची त्यांनी मला परत केली.
"अंकल हम टैक्सी देखते है. पुलीसवालों से पुछकर देखते है." मी सुचविले.
"देखो बेटा हो सकता है तो."
"ठिक अंकल" म्हणून मी तेथून निघालो. घनदाट धुक्यामुळे स्टेशन परीसराच्या बाहेर जाण्याची हिम्मतही होत नव्हती. पण तरीही रात्री थंडीचा कहर होणार हे माहित असल्यामुळे तेथे थांबणेही योग्य नव्हते. धुक्यातही कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांनी थोड्या अंतराव शेकोटी पेटविलेली दिसली. तिथच जाऊन विचारावं असा ठरवून मी शेकोटीकडे निघालो.
"कौण है तु ? तन्ने के चेहीए ?"  जवळ जाताच ठेठ हरियाणवी आवाज कानावर पडला. ड्युटीवर तैनात असणाऱ्या चार-पाच पोलीसांपैकी एकाचा तो आवाज होता. मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. यावर त्यांच्यातलाच एक म्हणाला.
"भाईसाब, गलती कर दी आपने यहाँ उतर के... फिर भी बैठो बुढऊँ के पास देखते है कुछ होता है तो."
"सर, मेट्रो तक जाने का भी इंतजाम हो जाए तो चलेगा" मी विनंती केली.
"अरे कौनसे तुम प्राईम मिनिस्टर हो जो घर तक छोडेंगे." त्यांच्यातला एकजण बोलला.
"वहीं जाकर बैठो कुछ मिलेगा तो हम भेज देंगे." जरा समजदार वाटणाऱ्या पोलीसाने सांगितले.
"धन्यवाद !" म्हणून मी म्हातारा-म्हातारीकडे परत आलो.
"कुछ मिला ? " म्हाताऱ्याने विचारले.
"नहीं. लेकीन पुलीसवाले बोले की....."
"भेन दे टके... कुछ नहीं करेंगे हरामखोर..." माझे वाक्य पुर्ण व्हायच्या आत म्हाताऱ्याने शिवी हासडली.
इतका वेळ दाबून ठेवलेला राग अखेर पोलीसांना शिवी देऊन त्याने काढला होता. "उन्हे भी क्या बोले बेटा. हमारी ही गलती है. थोडा पता होता तो इस स्टेशन पर उतरते ही नहीं." तो म्हणाला.
"अब चलती ट्रेन में थोडेही पता चलेगा की आगे क्या हुवा है." मी म्हणालो
"चलो, ये भी सही."
थंडीचा चांगलाच तडाखा बसत होता. आम्हाला त्या स्टेशनवर उतरुन एक तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. बराचसा वेळ आमचा एकमेकांशी न बोलण्यातच गेला होता. कुडकुडणाऱ्या थंडीत किमान एकमेकांशी बोलण्याने थोडी ऊब तरी मिळेल म्हणून मी म्हाताऱ्याला विचारले.
"अंकल, दिल्ली में आप क्या करते है."
''बेटा हमारी कपडे की दुकाने है करोल बाग में.''
''अच्छा !''  
''दो साल पहले तक बैठता था दुकान पर. एकही बेटा है. सोचा उस के हाथ दे कर बाकी दिन आराम से काट लूँगा. मगर.....''
एवढ्यात म्हातारीने त्याचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. म्हाताऱ्याने आपले पुढचे शब्द ओठातून बाहेर येऊ दिले नाहीत. थोडा वेळ असाच शांततेत गेला. मी पुन्हा विचारले...
''आंटी, पोता-पोती तो होंगे,'' मी विचारलं
हाँ हाँ !  नातवंडाचं नाव काढताच इतका वेळ म्लान असलेला म्हातारीचा चेहरा एकदम उजळला. एक पोता है. दो पोतीयाँ है. सब ठिक है. पोता अभी छोटा है एक पोती पैटींग का क्लास करती है. बडी तो अब कालेज भी जाने लगी है. तिने माहिती पुरविली.  
अपनी बच्ची कालेज जाता है म्हाताऱ्याने आश्चर्याने विचारले.
हटो जी ! जैसे की आप को पता ही नहीं. म्हातारीने लटक्या रागाने म्हाताऱ्याकडे पाहिले.
अरी !  इतनी सी ही तो थी ना.... कितनी सुंदर...  
हां हां मुझे याद है. जब वह पैदा हूई थी तब आपने जेब मे हाथ डालकर एक मुठ्ठीभर हजार हजार के नोट दिए थे नर्स को. बोले थे मेरी बेटी आयी है... बच्चे की तरह खुश हो गए थे आप. इतना तो महेश पैदा हूवा था तब भी नहीं हुए थे...  
दोघांच्याही चेहऱ्यावर त्या सुखद क्षणांच्या स्मृतींनी गर्दी केल्याचे स्पष्ट दिसत होते.
कालेज जाने लगी है तो अब तो उसकी शादी की तैय्यारीयाँ करनी पडेगी कुछ सालों बाद, म्हातारा म्हणाला.
पढेगी ना पहले. उस के बाद करेंगे. म्हातारी म्हणाली.
पता नहीं हम होंगे या नहीं तब तक. म्हातारा म्हणाला.
अभी और सौ साल तक जिएंगे जी... बच्ची की शादी तो देखनी ही है. म्हातारी म्हणाली.
यावर म्हातार दिलखुलासपणे हसला.
कितनी सुंदर है ना अपनी बच्ची. म्हातारी म्हणाली.
और दिल की कितनी साफ. पता है स्कुल से जब दुकान पर आती थी तब हमेशा मेरे लिए कुछ न कुछ लाती थी जरुर. कहती थी दादाजी आप के लिए लायी हूँ स्कुल से....
ऐसी ही निराली है वह... म्हातारीने त्याच्या सुरात सुर मिसळला.  
वैसे बेटा तुम क्या करते हो. म्हाताऱ्याने विचारले
जी अंकल !  मै पत्रकार हूँ. पटेल नगर में ही रहता था पहले अब व्दारका रहता हूँ. मी माहिती पुरविली.
पत्रकार ! अरे भाई, मै तो बडे आदमी के साथ हूँ..... म्हाताऱ्याने माझ्याकडे पाहत टाळी देण्यासाठी हात पुढे केला. एवढ्यात त्याच्या खिशातला मोबाईल वाजला.
सुनो जी ! आपका फोन बज रहा है. म्हातारीने आठवण करुन दिली.
म्हाताऱ्याने फोन बाहेर काढण्यासाठी खिशात हात घातला.
हर बार मुझे ही याद करवाना पडता है इन्हे... थोडंसं हसत म्हातारीने मला सांगितले. जराशा नाराजीने म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहिलं. तोपर्यंत खिशातून फोन बाहेर आला होता.
अरे ! बच्ची का फोन है. म्हातारा एकदम खुश झाला आणि त्याने तत्काळ फोन रिसीव्ह करुन कानाला लावला.
हेल्लो... हां बेटा...
हां हां... हम यहीं है.... लेकीन तुम क्यूँ... वो नलायक कहाँ है.... अच्छा अच्छा.... स्टेशन के बिल्कुल बाहर... एक सज्जन खडे है हमारे साथ... घबरावो नहीं पत्रकार है.... अच्छा... ठिक है... रखता हूँ... म्हाताऱ्याने फोन ठेवला.
क्या कह रही थी बच्ची, म्हातारीने मोठ्या उत्सुकतेने विचारले.
कह रही थी, गाडी लेकर आ चुकी है फरिदाबाद में....
बहू को भी अक्ल नहीं है. जवान बेटी को इस समय भेज दिया. म्हातारीला खरंच राग आलेला होता.
ऐसा नहीं है. महेश को फोन किया था न् हमने तब बच्ची उस के साथ ही थी. बाप से झगडा कर के खुद गाडी चलाते हुए आयी है. म्हाताऱ्याने माहिती पुरविली.
यह लडकी भी ना.... म्हातारीच्या तक्रारीत कौतुकाचाही स्वर मिसळलेला होता.
एवढ्यात एक मोठी गाडी स्टेशनच्या आत शिरताना दिसली. पोलीसांच्या शेकोटीजवळ काही क्षण ती थांबली. पण थोड्याच वेळात ती पुढे आली आणि थेट आमच्याजवळ येऊन थांबली.
गाडीतून एक सुंदर तरुणी उतरली.
दादाजी, आप यहाँ क्यूँ उतर गए, आप को पता है ना इस तरफ कुछ भी हो सकता है. दादी, आप तो रोक सकती थी इन्हे....  
उतरताच तिने दोन्ही म्हाताऱ्यांना फैलावर घेण्यास सुरूवात केली. तिच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहताच दोघांच्याही डोळ्यांतले भावनांचे धरण फुटले. दोघे एकही शब्द न बोलता तिच्यापुढे उभे होते.
समान कहाँ है आप का... तिने विचारले. बाकड्यावर ठेवलेली एक बॅग तिने हातात घेऊन गाडीत ठेवली. तोपर्यंत मी पण दुसरी बॅग उचलून तिच्याकडे दिली. ते दोघेही गाडीत जाऊन बसले. माझ्याकडे पाहत तिने विचारले
सर, आप कहाँ तक जाएंगे. मै छोड दूँगी आप को...
नहीं, मै चला जाऊँगा... मी म्हणालो.
चलीए, मै आप को मेट्रो तक छोड दूँगी. आप को वैसे भी यहाँ पर कुछ मिलेगा भी नही. ती म्हणाली.
यावर मी पण एक शब्दही न बोलता तिच्यापाठोपाठ गाडीत जाऊन बसलो. चावी फिरवून तिने गाडी स्टार्ट केली. गाडी सुरू झाली. पाठीमागे बसलेले दोघे काहीच बोलत नव्हते. गाडीत शांतता होती. बाहेर धुक्याने परिसर अंधुक झाला होता... त्या धुक्यातून वाट काढत गाडी पुढे जात होती. दहा मिनिटांनंतर तिने गाडी थांबविली.
सर, आप का मेट्रो स्टेशन आ गया... ती म्हणाली.
थँक्स म्हणून मी गाडीचा दरवाजा उघडला. बाहेर आलो. दरवाजा ढकलण्यापुर्वी म्हातारा-म्हातारीकडे पाहिले.
अंकल-आण्टी, आप के पास तो हिरा है. इसे सँभालकर रखिएगा. मी म्हणालो.       
हाँ बेटा. जानते है. म्हातारी म्हणाली.
चलता हूँ. फिर मिलेंगे म्हणून मी दरवाजा बंद केला.
दरवाजा बंद होताच तिने गाडी चालू केली. गाडीच्या काचांतून मी आत पाहण्याचा प्रयत्न केला. धुक्यामुळे गाडीच्या काचांवर एक थर साचला होता. पण मना-मनाच्या काचा केंव्हाच स्वच्छ झाल्या होत्या. तिकडे मला व्दारकेकडे जाणारी शेवटची मेट्रो पकडण्याचे वेध लागले होते.
समाप्त

सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

बेपत्ता राधेचा पत्ता...!



देशाच्या फाळणीनंतर निर्वासितांचे लोंढे दिल्लीपासून दूर वसविण्यात आले होते. फाळणीच्या जखमांवर काळाची खपली चढल्यानंतर हळूहळू निर्वासितांनी आपले बस्तान या शहरात बसविण्यास सुरूवात केली. व्यापार-उदीम आणि इतर क्षेत्रांतही या लोकांनी आपला जम बसविला. काळ बदलला आणि त्याबरोबरच फाळणीचे व्रणही पुसट झाले. लाहौर, कराची, पेशावर,रावळपिंडीच्या आठवणींत रमून जाणारे बुजुर्गही काळाच्या पडद्याआड झाले. निर्वासितांच्या वसाहती शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या. या वसाहती आता शहरांतील सधन वसाहतींमध्ये गणल्या जातात. काही शेकड्यांच्या मोबदल्यात मिळालेले भूखंड आज दिल्लीच्या रियल इस्टेट मार्केटमध्ये कोट्यवधींच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. याचे श्रेय अर्थातच मेट्रोला जाते यात शंका नाही. 
मेट्रो या शहराची लाईफलाईन झाली आहे. ज्या भागातून मेट्रोने आपल्या नागमोडी चालीतून अस्तित्त्वाच्या खुणा उमटविल्या आहेत त्या भागाचा कायापालट झाला आहे. जुनाट इमारतींचे रुपडे पालटून त्या जागी अलिशान टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. अरुंद बोळकांडातील बाजारांचे रुपांतर मॉल्समध्ये झाले आहे. पत्र्याच्या डुगडुगणाऱ्या बसची जागा वातानुकुलित बसेसने घेतली आहे. सर्व सुखसोयी असूनही या भागात आजही घरभाडी फारशी नसल्यामुळे बाहेरुन येणाऱ्यांसाठी येथे घर घेणे सोयीचे ठरते. सुरूवातीच्या काळात यामुळेच पटेल नगर परिसरात मी सहकुटुंब राहण्यासाठी आलो होतो.... त्या काळातील हा प्रसंग आजही तेवढाच अस्वस्थ करणारा....... 
रोजच्याप्रमाणे त्या दिवशीही मी घाईघाईने घराकडे निघालो. इमारतीच्या पायऱ्या चढताना जाणवले की, रोज या वेळेला दिसणारी ती काळी बुटकी मुलगी आज नेहमीप्रमाणे दिसत नाही. आमच्या घरमालकाची ही मोलकरीण अर्थात 'डोमेस्टीक मेड'. घरमालकाच्या मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याच्या गडगंज सासुरवाडीकडून हुंड्यासह आलेली ती मुलगी... बारा-तेरा वर्षाचीच असेल... बंगालच्या पुरुलिया जवळच्या कुठल्याशा गावातून रोजगाराला लावण्यासाठी तिच्या आईवडीलांनी तिला दिल्लीला पाठवून दिले होते. दिल्लीत काही दिवस दूरच्या नातेवाईकांकडे राहिल्यावर एका एजन्सीच्या माध्यमातून तिला या घरात काम मिळाले होते. त्याबदल्यात तिच्या आई-वडीलांना वीस हजार रुपये मिळाले आणि महिन्याचे दोन-अडीच हजार रुपयांची फिक्स मनीऑर्डर ....


सुरूवातीच्या काळात ती जिन्यातून आपला चेहरा लपवत खाली राहणाऱ्या मोठ्या मालकाच्या म्हणजेच माझ्या घरमालकाचे घर ते तिसऱ्या मजल्यावर राहणारी नवी मालकीण म्हणजे घरमालकाची सुनबाई अशा फेऱ्या घालत असायची. बिचारी राधा, या फेऱ्या घालून अक्षरशः दमलेली असायची. एकदा मी तिला तिचे नाव विचारले, यावर ती फक्त हसली. आणि बंगालीमिश्रीत हिंदीत विचारले, 
तुमी बंगाली ना ? 
यावर मी नाही अशी मान हलविली. यावर ती पुन्हा हसली आणि 
भैय्या, राधा है नाम असं म्हणाली. तिला पुढे काहीतरी सांगायचं होतं एवढ्यात मोठ्या घरातून तिच्या नावाचा उद्धार झाला आणि ती धावतच खाली पळाली. यानंतर ती हमखास जिन्यात दिसायची. माझी घरी येण्याची वेळ आणि तिची जिन्यातून धावपळ करायची वेळ सारखीच असायची. एरवी, मला बुजणारी राधा त्या दिवसाच्या संभाषणानंतर 'नमस्ते भैय्या' म्हणण्याइतकी धीट झाली होती. राधा सब ठिक एवढं विचारलं तरी तिच्या चेहऱ्यावर अपार समाधान दिसायचं. एक दिवशी बायकोनं तिला थोडी मिठाई दिली. मोठ्या आवडीने तिने ती खाल्ली. त्या दिवशी ती मोडक्या तोडक्या हिंदीत आपल्या परीवाराबद्दल बोलली. चेहऱ्यावर तिचं तेच हसू होतं पण डोळ्यातला विषाद तिला लपविता आला नव्हता.
घरभाडे देण्याचा दिवस असल्यामुळे घरभाड्याची रक्कम घेऊन मी खाली राहणाऱ्या मालकाकडे जाऊ लागलो. पायात स्लीपर्स घालून मी पायऱ्या उतरल्या. खालच्या मजल्यावर येऊन बेल वाजविणार तोच घाईघाईने त्यांचा दुसरा नोकर विठ्ठल बाहेर निघाला.
विठ्ठल, क्या बात है ? मालिक घर मे है तुम्हारे ? मी विचारले.
जी साहब, घर मे है. त्याने उत्तर दिले. कुछ प्रॉब्लेम तो नहीं ना ? मी विचारले.
जी, राधा गायब है, विट्ठलने मला माहिती पुरविली.
क्या ? मी चमकलो. पुलीस मे रिपोर्ट करी ?      
मरना है क्या साब, पुलीस इनको ही ना पकडेगी ? विठ्ठल म्हणाला
मतलब ?
कुछ नहीं , बच्ची छोटी है ना साब. घर की याद आ रही थी. तीन दिनसे घर जाना है बोल रही थी..
बेचारी को छोटी मालकिन ने भुखा रखा था दोन दिन से. तो भाग गयी साब, विठ्ठलने आत आवाज जाणार नाही एवढ्या हळू आवाजात सांगितले.

अरेरे बुरा हुवा, मी म्हणालो. घरमालकाकडे घरभाड्याची रक्कम देऊन मी माघारी आलो.
रात्रीच्या साडेआठ वाजल्या असतील. कुल्फी आणण्यासाठी मी पुन्हा एकदा खाली आलो. घरापासूनच्या जवळच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस कुल्फीचे गाडे उभारलेले असत. रात्रीच्या अंधाराला दूर करणारे महापालिकेचे दिवे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्याने मोठ्या शहरांमध्ये रात्रीचा दिवस होतो. घरापासून थोडे अंतर चालून जातो ना जातो तोच भैय्या, अशी चिरपरिचित हाक माझ्या कानी पडली. मी आवाजाच्या दिशेने पाहिले. दूरवरुन धावतच येणारी एक छोटी मुलगी मला दिसली. जसजशी ती जवळ येऊ लागली तसतशी तिची आकृती स्पष्ट झाली. होय, ती राधाच होती. जसजसं अंतर कमी झालं ती धावतच माझ्याकडे आली
भैय्या, मुझे घर ही नहीं मिल रहा था, अच्छा हुवा आप मिल गए, मुझे घर ले चलो, राधा धापा टाकत बोलू लागली. डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. मुझे घर ले चलो, तीने पुन्हा विनंती केली.
तु थी कहाँ ? मी विचारले
गाँव जाने के लिए निकली थी भैय्या मगर फिर वापस आ गयी, ती म्हणाली
क्यूँ ? मी प्रश्न केला.
बाबा तो वापिसही भेजेगा ना, क्या करुँगी वहाँ जाकर ? तिने प्रतिप्रश्न केला.
तिच्या निरुत्तर करणाऱ्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. 
कुल्फी न घेताच मी माघारी फिरलो. राधाला तिच्या मालकाच्या स्वाधीन करुन मी घरात आलो. पुढची दोन दिवस राधा जिन्यात दिसली नाही. त्यानंतर मात्र ती रोज जिन्यात दिसायची. न चुकता नमस्ते करायची. त्यानंतर चार महिन्यांनी आम्ही ते घर सोडलं. 
एक वर्षाच्या गॅपनंतर त्या भागात जाणं झालं. इमारतीच्या पायथ्याशीच मला विठ्ठल दिसला.
मला पाहताच ओळखीचे हसू घेऊन तो समोर आला.
कैसे हो विठ्ठल मी विचारले
आपकी कृपा है साब. तो म्हणाला
तुम्हारे मालिक ?
ओफीस गए है. सब ठिक-ठाक है
एकदम मला राधाची आठवण आली.
राधा है अभी ? भागी तो नही ? मी विचारले
यावर विठ्ठल हसला. भागी तो नहीं मगर...
मगर क्या ? मी विचारले
घर गयी थी... वापिस आयी ही नहीं. सुना है वही किसी के साथ उसकी शादी करवा दी. विठ्ठल उत्तरला
शादी ? अरे छोटी लडकी है वह
तो क्या होता है साहब, गरीब के मजबूरी की कोई उम्र होती है साहब तो म्हणाला.
मी वर जिन्याकडे पाहिले. उगाचच भांगात लांबवर कुंकू भरलेली राधा मला दिसली. नमस्ते भैय्या ! तिचा आवाज माझ्या कानावर येऊन आदळू लागला.
समाप्त      




मंगळवार, २९ जानेवारी, २०१३

 
 
 
 
 
 
माझे शब्द मुके
आणि संवेदनाही
माझी दृष्टी बहिष्कृत
आणि वेदनाही...

मोकळ्या आकाशाची
यावी अंगावर निळाई
मंद मंद हसावा
तळपता सूर्य...